सुलवाडे-जामफळ-कनोली योजनेचे काम लवकरच पूर्ण होणार – पालकमंत्री जयकुमार रावल यांची माहिती

प्रकल्प क्षेत्रातील ५२ हजार ७२० हेक्टर जमीन येणार लवकरच सिंचनाखाली येणार

सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचे ८१ टक्के काम पूर्ण; पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून कामाचे कौतुक

धुळे,दिनांक 14 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व धुळे तालुक्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणारी सुलवाडे -जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेचे 81.44 टक्के काम पूर्ण झाली आहेत. या योजनेचे सर्व कामे प्रगतीपथावर असून यामुळे लवकरच 52 हजार 720 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. या योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांतील 26,907 हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर सुलवाडे – जामफळ धरणावरून शेतकऱ्यांच्या शेतात थेट बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे नेणाऱ्या पीडीएन योजनेचे कामही प्रगतीपथावर आहे, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

आज पालकमंत्री रावल यांनी सुलवाडे जामफळ कनोली योजनेच्या सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. दरम्यान पाहणी करताना त्यांनी कामाच्या प्रगतीचे कौतुक केले.यावेळी चालू असलेल्या कामाची माहिती कार्यकारी अभियंता श्री. संदीप पवार व उप अभियंता श्री. विशाल खैरनार यांनी दिली. जलसंपदा विभागाचे उपअभियंता श्री. चंद्रशेखर पाटील, श्री. नितीन पाटील व श्री. केतन देसले तसेच इंडियन ह्यूम पाईप कंपनीचे श्री. जोशी, श्री. शिंगोटे व इतर अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्पातील जामफळ धरण, विविध पंपगृहे, उर्ध्वगामी व गुरुत्वगामी नलिका या सर्वांची कामे 80 टक्क्यांहून अधिक झाल्याची माहिती पाहणीदरम्यान मिळाली. योजनेची प्रगती पाहून पालकमंत्री रावल यांनी समाधान व्यक्त केले.

दभाशी पंपगृहाचे काम 95 टक्के, गोराणेचे 99 टक्के, सोनगीरचे 98 टक्के, वडजाईचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. पिंपळे धरणाचे काम पूर्ण झाले असून वेल्हाणे व बाबरे धरणांची अनुक्रमे 37 टक्के व 60 टक्के प्रगती झाली आहे. मौजे लळिंग येथील पंपगृहाचे चे काम 94 टक्के पूर्ण आहे, अशी माहिती यंत्रणेकडून त्यांना यावेळी देण्यात आली.

याच धरणावरून शेतकऱ्यांच्या शेतात बंदिस्त नलिका प्रणाली द्वारे  (पीडीएन) पाणी पोहोचवणाऱ्या योजनेचे प्रगतीपथावर आहे. १६५ कि.मी.पेक्षा अधिक मुख्य पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. या कमा बाबत ही आढावा त्यांनी यावेळी घेतला. सारवे, कलमाडी, माळीच, वाघोडे, अजंदे बु., बेटावद, पढावद, पाष्टे, मुदावड, म्हळसर, वारूड, बाभळे, जातोडे, पिंपरखेडा, नरडाणा, पिंप्राड, कमखेडे, वडली, हुंबरडे, वीकवेल, वाघाडी खु., वाघाडी बु., , भीलानेडीगर, मेलाने, वालखेडा व बाभळदे या गावांमधील उपनिलकांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून या गावांना मुख्य धरणाशी जोडणाऱ्या पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर आहे.

या योजनेतंर्गत 12 पाणी वापर संस्थांची इमारतींचे बांधकाम सुरू आहे, ते ही प्रगती पथावर आहे. जलसंपदा विभागाने वेगवान काम केल्यामुळे मंत्री रावल यांनी समाधान व्यक्त करून काम अपेक्षित वेळेत पूर्ण होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी काही निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

000