धरण व्यवस्थापनाने पाण्याच्या विसर्गाचे काटेकोर नियोजन करावे -पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

लोकांची गैरसोय टाळण्यासाठी यंत्रणांनी दक्ष रहावे, अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये
सातारा दि.19 : कोयना धरणासह जिल्ह्यातील विविध प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात 16 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढत असून सद्य स्थितीत कोयना धरणात जवळपास 100 टीएमसी साठा होत आला आहे. कोयना धरणाची साठवण क्षमता 105 टीएमसी आहे. कोयना धरणात 81 हजार क्युसेक पाण्याचा येवा होत असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे 6 वक्र दरवाजे 9 फुटांवरुन 11 फुटांपर्यंत उघडण्यात येणार आहेत.  व आज दुपारपासूनच धरणातील पाण्याचा विसर्ग 80 हजार क्युसेक करण्यात येणार आहे.  त्यामुळे पावसाचा जोर असणाऱ्या व धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे बाधित होणाऱ्या लोकांना आवश्यकता भासल्यास स्थलांतरीत करण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक ती सर्व तजवीज ठेवावी.  जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या धरण कार्यस्थळावर थांबावे. कोणत्याही स्थितीत लोकांची गैरसोय होणार नाही यासाठी सर्व तालुकास्तरीय आणि क्षेत्रिय यंत्रणानी दक्ष रहावे. कोणीही मुख्यालय सोडू नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दुरदृश्यप्रणालीवरुन जिल्ह्यातील पर्जन्यस्थितीचा आढावा घेतला.  यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. काटकर, कोयना धरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. महेश राशणकर यांच्यासह कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पर्जन्य स्थितीचा व संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेऊन पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले, कोणत्याही स्थितीत पावसाचा जोर वाढला तरी परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी धरण व्यवस्थापनाने पाण्याचे विसर्गाचे काटेकोर नियोजन करावे. जिल्ह्यात पावसाचा वाढता जोर पाहता नदी काठच्या लोकांनी सतर्क रहावे, नदीकाठी पाण्यात जाऊ नये,  प्रशासनाच्या आवाहनाला  सहकार्य करावे.   सर्व स्थितीत प्रशासन तुमच्या बरोबर आहे.  या भागात पोलीसांनी रात्रीची गस्त वाढवावी. जिल्हा परिषदेने ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा.  वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कार्यस्थळांवर 24*7 तास उपस्थित रहावे.  साथीचे रोग, अतिसार, ताप थंडी अशा सर्व आजारांवरील औषधे उपलब्ध ठेवावीत. अॅब्म्युलंस उपलब्ध ठेवाव्यात. विद्यूत पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी जनरेटर सेट उपलब्ध ठेवावेत.  विद्यूत विभागाने दुर्गम भागातील वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी दक्ष राहावे. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून संबंधित यंत्रणांनी आपली पथके कार्यरत ठेवावीत असे सांगून पालकमंत्री म्हणाले,  आवश्यकतेनुसार लोकांना स्थलांतरीत करत असताना  त्यांना अंथरुण पांघरुन, स्वच्छ पिण्याचे पाणी, जेवण, औषधे यांची तजवीज ठेवावी.  गरजेच्यावेळी उपयोगात आणण्यासाठी कोयनानगर कॉलनीतील रिकाम्या क्वाटर्सही सुस्थितीत ठेवण्याच्याही सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. तसेच झाडे-झुडपे रस्त्यावर उन्मळून पडल्याने, दरड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्यास जेसीबी लावून तात्काळ रस्ता मोकळा करावा व वाहतूक सुरळीत करावी, ज्या ठिकाणी रस्ते पाण्याखाली जात आहेत, गावांचे संपर्क तुटत आहेत अशा ठिकाणी धोक्याच्या सूचनांचे फलक लावावेत अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
सद्यस्थितीत कोयना धरणाचा जवळपास 100 टीएमसी साठा होत आला असून कोयनाधरणस्थळावर उद्या जलपूजन करुन ठिकठिकाणी असणाऱ्या परिस्थितीची पाहणी करण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्ह्यातील विविध धरणांमधील पाणीसाठा, येवा, विसर्ग, धरण पाणलोटक्षेत्रात पडणारा पाऊस तसेच पाटण, नवजा, तापोळा, कोयना, दरे, महाबळेश्वर, सातारा, केळघर, मेढा, जावळी आदी विविध ठिकाणच्या पर्जन्य स्थितीची माहिती पालकमंत्री श्री. देसाई यांना दिली.   कृष्णा कोयना काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सर्व अधिकारी फिल्डवर राहतील, असेही निर्देशित केले.
000