मुंबई, दि. २२ : शांघाई (चीन) येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ करिता जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरून प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने मुंबईतील इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी https://skillindiadigital.gov.in/ किंवा https://kaushalya.mahaswayam.gov.in/Users/ या लिंकवर भेट देऊन आपली नाव नोंदणी करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षांखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही ऑलिम्पिक खेळासारखीच स्पर्धा आहे. ही स्पर्धा यापूर्वी ४७ जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये ६३ सेक्टर मधून ५० देशातील दहा हजारहून जास्त उमेदवार समाविष्ट असून ही स्पर्धा १५ देशात १२ आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
यापुढील जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ ही शांघाई (चीन) येथे आयोजित होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करण्यात येणार असून स्पर्धेत निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.
जागतिक कौशल्य स्पर्धा खालील अभ्यासक्रम/क्षेत्राकरिता आयोजित केली जाणार आहे :-
जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ५० क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी, २००४ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच, Digital Construction, Cloud Computing, Cyber Security, ICT Network Infrastructure, Additive Manufacturing, Industrial Design Technology, Industry ४.०, Mechatronics, Optoelectronic Technology, Robot Systems Integration, Water Technology, Dental Prosthetics, Aircraft Maintenance या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी, २००१ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ स्पर्धेसाठी निश्चीत करण्यात आलेल्या क्षेत्रांची यादी संकेतस्थळावर पाहता येईल.
तसेच स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक नोंदणी केलेल्या उमेदवारांना यथावकाश कळविण्यात येईल, तसेच काही अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर १७५ श्रेयस चेंबर, १ ला मजला, डॉ.डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी ०२२-२२६२६४४० यावर संपर्क करावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
०००
गजानन पाटील/विसंअ/