पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा सर्व विभागांनी समन्वयाने काम करून यशस्वी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि. २२ – पुणे ग्रँड चॅलेंज टूर, सायकल स्पर्धेच्या संदर्भात सर्व विभागांनी आपल्या कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून समन्वयाने काम करून स्पर्धा यशस्वी करावी. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित,पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेत संदर्भात आढावा बैठकीत श्री. पवार बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय चौबे, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा आयुक्त  शीतल उगले,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पी एम आर डी ए चे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून पुण्यात ही स्पर्धा प्रथमच होत आहे. या स्पर्धेच्या उत्तम प्रकारे आयोजनासाठी सर्वांनी सहकार्य करावे, या संदर्भात विभागीय आयुक्त यांनी दर 15 दिवसांनी बैठक घेऊन कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, शासनासाठी हा एक महत्त्वाचा उपक्रम असून याचे उत्तम प्रकारे आयोजन करण्याची जबाबदारी सर्व यंत्रणांवर आहे त्या दृष्टीने सर्वांनी सहभाग घेऊन काम करावे अशा सूचना घेऊन श्री पवार पुढे म्हणाले, शहरात बेकायदेशी होर्डिंग लावू देऊ नका शहराचे विद्रूपीकरण खपवून घेतले जाणार नाही अधिकृत असलेल्या होर्डिंग वरच बॅनर लावावीत या संदर्भात महापालिकेने दक्षता घ्यावी. असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाचे सर्व काम गुणवत्ता पूर्ण झाले पाहिजे याकडे लक्ष द्यावे पुणे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने आपापल्या हद्दीतील कामे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले.

बैठकीत स्पर्धेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग क्रीडा विभाग, जिल्हा परिषद, पीएमआरडीए अशा अनेक यंत्रणाचा कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री राम यांनी महापालिकेतर्फे सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आपल्या कामकाजाचे सादरीकरण केले. बैठकीच्या सुरुवातीला प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी पुणे ग्रँड टूर, उपक्रमाविषयी माहिती दिली.

या आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी, गणेशोत्सव संदर्भातील पूर्व तयारीचा आढावा घेतला.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मिरवणूक, गणेश भक्तांच्या गर्दीचे व्यवस्थापन, गणेशोत्सव काळात त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा,रस्ता वाहतूक नियोजन, गणपती मंडळाचे मिरवणूक मार्ग आदि विषयाबाबत माहिती दिली.

००००