आयुष्मान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा – पालकमंत्री संजय शिरसाट

पालकमंत्र्यांनी घेतला विविध विषयाचा आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि. २२ (जिमाका)- आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ गरजू रुग्णांना वेळेत मिळावा यासाठी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा, त्यासाठी रुग्णालयांनी तत्पर रहावे,असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शिरसाट यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य  योजनेचा आढावा घेतला.  बैठकीस खासदार डॉ.भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महानगरपालिकेचे आयुक्त जी .श्रीकांत, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके , निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर ,महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.रवी भोपळे यांच्यासह आरोग्य यंत्रणातील संबंधित अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.

जिल्ह्यात एकूण 81 रुग्णालय हे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या उपचारासाठी संलगनीत असून या योजनेचा लाभ गरजू रुग्णांना रुग्णालयाच्या माध्यमातून देण्यात येतो. रुग्णालयाने विविध कागदपत्राच्या अभावी रुग्णास वेठीस धरू नये. आलेल्या रुग्णास   वेळेत उपचार करून आरोग्य सेवा देण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले .संबंधित नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये रुग्णांना होणारी गैरसोयी टाळावी.त्याचप्रमाणे रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयावर आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री शिरसाट यांनी दिले. जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ई  केवायसी करून  घ्यावी.सेतू सुविधा केंद्र,आशाताई, व स्वस्त धान्य दुकानदार  यांचे सहकार्य करून ई केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नागरिकांना केले .  यासाठी  जिल्हा प्रशासनाने संबंधित आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकानदार आणि अशा अंगणवाडी सेविका यांना सूचित करण्याचे निर्देश  दिले.

महसूल व कृषी विभागाचा आढावा

जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टी झालेल्या मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून तात्काळ याबाबतची मदत  मिळवून द्यावी. यासाठी कृषी आणि महसूल विभागाने पंचनामे करून प्रक्रिया पूर्ण करावी .ज्या गावांमध्ये पुराच्या पाण्यामुळे रस्ते वाहून गेलेले आहेत. तेथे उपाययोजना करून सुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांना वेळेत मदत करण्यात कृषी विभाग आणि महसूल विभागाने कुचराई करू नये.  शेतीचे नुकसान पाहणी प्रत्यक्ष  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतीवरच्या बांधावर जाऊन पाहावे व त्याचे योग्य निरीक्षण पंचनाम्यात नोंदवावीत जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळण्यास मदत होईल असे पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले.

00000