भारतीय स्वातंत्र्याचा आज ७३ व्या वर्धापनदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या मायभूमीला परकीय सत्तेच्या जोखडातून सोडवण्यासाठी अनेक थोर विभूतींनी आपल्या प्राणाची बाजी लावली. अविरत संघर्षानंतर आपला देश गुलामगिरीतून मुक्त झाला. अनेक शूरवीरांच्या बलिदानामुळे आपण आज स्वाभिमानाने, स्वतंत्र जीवन जगतो आहे. त्यांनी सांडलेल्या रक्तातूनच आजचा भारत घडला आहे. या सर्व शूरवीरांना वंदन. या शुरविरांच्या बलिदानातून, संघर्षातून प्रेरणा घेवून आज आपल्या समोर ठाकलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना हिंमतीने करण्याची गरज आहे.
‘कोरोना’ विरुद्धच्या लढाईत महाविकास आघाडीचे सरकार २४ बाय ७ कार्यरत!
कोरोनाचे संकट सगळ्या जगासाठीच नवीन आहे.त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करताना अनेक नव्या अडचणी उभ्या राहत आहेत. अनेक बाबी नव्याने उभाराव्या लागत आहेत. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे आज आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. या काळात राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब या दोघांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारमधील सर्व मंत्री, राज्यमंत्री हे प्रत्यक्ष फिल्डवर जावून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणेकरीता प्रयत्न करीत आहेत. कोरोना विरुध्दच्या लढाईत महाविकास आघाडी सरकार राज्यातील जनतेच्या सेवेसाठी २४ बाय ७ कार्यरत आहे, याचे विशेष कौतुक आहे.
जीवाची पर्वा न करता ‘कोरोना’ विरुद्धचा लढा लढणाऱ्या
सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे कार्य कौतुकास्पद
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे याकरीता सर्वोत्तोपरी प्रयत्न सुरु आहेत. या काळात शासन, प्रशासन, विविध यंत्रणा अनेक आघाड्यांवर लढत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या जिल्हयातील जिल्हास्तरीय सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा, डॉक्टर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा वर्कर, पॅरामेडिकल स्टाफ, होमगार्ड, सफाई कामगार, महसूल व इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी कोरोना प्रतिबंधासाठी लढत आहेत. जोखीम पत्करून आपले कर्तव्य बजावत आहेत, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या संचारबंदीची पोलीस विभागाने कडक अंमलबजावणी केली आहे. जिल्हाबंदीची सुद्धा कडक अंमलबजावणी करण्यात जिल्हा पोलीस यंत्रणेला यश आले आहे ही कौतुकाची बाब आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी सर्वोतोपरी तयारी
कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात रॅपिड एँटिजेन टेस्ट मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. लवकरच जिल्ह्यासाठी स्वतंत्र आरटी-पीसीआर (RT-PCR) प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून बाधित व्यक्तींवर उपचारासाठी जिल्ह्यात १३ कोविड केअर सेंटर तयार केली आहेत. कारंजा व वाशिम येथे कोविड हेल्थ सेंटर आणि वाशिम येथे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलची सोय उपलब्ध केली आहे. या त्रिस्तरीय रचनेद्वारे जिल्ह्यात सध्या १२६० खाटांची सुविधा उपलब्ध आहे. तसेच १० व्हेंटिलेटरची सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अतिरिक्त बेड उपलब्ध होण्यासाठी खासगी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल अधिसूचित करण्यात येत आहेत.आवश्यता पडल्यास आणखी कोविड केअर सेंटर सुरु करण्याची तयारी आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी नवीन आरोग्य सुविधा व साहित्य खरेदीसाठी जिल्हा रुग्णालयाला आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे ३ कोटी ३९ लक्ष रुपये व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सुद्धा सुमारे २५ लक्ष रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा परिषद व जिल्हा सामान्य रुग्णालयाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे ७ कोटी ९७ लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात सध्या शासकीय, निमशासकीय व खासगी अशा एकूण ५३ रुग्णवाहिका सेवेत आहेत. तसेच नीती आयोगाच्या माध्यमातून लवकरच आणखी ११ रुग्णवाहिका आरोग्य यंत्रणेला मिळणार आहेत.
गरीब, गरजूंना अन्नधान्य वितरण; ‘शिवभोजन’चा लाभ
कोरोना प्रतिबंधासाठी सुरुवातीच्या काळात टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागला. या काळात गरजू व वंचित घटकांना रेशनच्या माध्यमातून नियमित धान्यपुरवठा सोबत मोफत धान्य वितरित करण्यात आले. एप्रिल ते जुलै या काळात नियमित लाभार्थ्यांसोबतच विस्तापित मजूर, केशरी कार्डधारकांना एकूण सुमारे ४१ हजार ९५८ मेट्रिक टन धान्य वितरित झाले आहे. गोरगरिबांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु केलेली शिवभोजन योजना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरु करण्यात आली. शिवभोजन थाळीचा दर टाळेबंदी काळात १० रुपयांवरून ५ रुपये करण्यात आला. एप्रिलपासून जुलै अखेरपर्यंत १ लक्ष ७५ हजार १३१ थाळी वितरीत करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कटिबध्द
टाळेबंदी काळात शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विभागाने मदत केली. यामाध्यमातून सुमारे ६ कोटी ९७ लक्ष रुपये किंमतीच्या २ हजार ७६७ मेट्रिक टन भाजीपाला, फळांची विक्री झाली. शेतकरी बांधवांच्या शेतमाल खरेदीची प्रक्रिया नियमित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. टाळेबंदी काळात कृषि उत्पन्न बाजार समित्या सुरु होत्या. या काळात शासकीय आधारभूत किंमतीने १ लक्ष ९ हजार क्विंटल तूर आणि ८६ हजार ७५७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आली. जिल्ह्यात यंदा शासकीय खरेदी केंद्रांवर विक्रमी २ लक्ष ६९ हजार ७०५ क्विंटल कापसाची खरेदी झाली. शेतकऱ्यांना सुमारे १३६ कोटी ६ लक्ष रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी सूट देण्यात आली. शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे, खते उपलब्ध करून देण्याची मोहीम कृषि विभागाने राबविली. ६९० गावातील २८ हजार ७४९ शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेतला. त्यांना ४० कोटी २४ लक्ष रुपये किंमतीची खते व बियाणे बांधावर पोहोच करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे वाहतुकीवरील सुमारे २६ लक्ष ३० हजार रुपयांची बचत झाली.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेने
शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढले
महाविकास आघाडीच्या सरकारने ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली. या योजनेद्वारे कर्जाच्या दुष्टचक्राखाली दबलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना बाहेर काढून चिंतामुक्त केले आहे. आतापर्यंत राज्यातील जवळपास २८ लाख शेतकऱ्यांना सुमारे १८ हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती देवून या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आघाडी सरकारला यश आले आहे. जिल्ह्यातील ८३ हजार २१३ शेतकऱ्यांना ५३४ कोटी ८७ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. कोरोना संसर्गामुळे स्थगित करण्यात आलेली कर्जमुक्तीस पात्र शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. उध्दवजी ठाकरे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत महाविकास आघाडी सरकारने दिलासा देण्याचे खुप मोठे काम केले आहे. याचा आर्वजुन उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.
रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न
कोरोना काळात विकासकामे थांबू नयेत म्हणून जलसंधारण, रस्ते, महामार्ग व इतर कामे सुरू करण्यात आली आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनही कामे सुरु आहेत. टाळेबंदी काळात १ एप्रिल पासून ८ हजार ८५९ कुटुंबाना या योजनेतून रोजगार मिळाला आहे. त्यातून २ लक्ष २३ हजार मनुष्यदिन निर्मिती झाली आहे. उद्योग,व्यवसाय बंद झाल्याने अनेक मजूर जिल्ह्यात परतले आहेत. या मजुरांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता प्रयत्नशील आहे. व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगार, स्वयंरोजगार विषयी मार्गदर्शन केले जात आहे.
कोरोनाला घाबरू नका, पण काळजी घ्या
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासन, प्रशासन पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना आपल्या सर्वांची साथ, सहकार्य आवश्यक आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाची साखळी तोडणे हाच कोरोनाला हरवण्याचा उपाय आहे. त्यामुळे अनावश्यकपणे फिरू नका. आवश्यक असेल तेव्हाच बाहेर पडा. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळा. लक्षणे दिसत असतील तर तत्काळ चाचणी करून घ्या. घाबरू नका, कुठलीही माहिती लपवू नका. कोरोनाचे लवकर निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरा होतो. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईत आपण सर्वांनी अधिक जबाबदारीने वागून आपल्या जिल्ह्याला, राज्याला आणि देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आपणा सर्वांना आवाहन करतो.
पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणां सर्वांना शुभेच्छा देतो !!
– श्री. शंभूराज शिवाजीराव देसाई,
राज्यमंत्री, गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन,
राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता,
पणन तथा पालकमंत्री वाशिम जिल्हा