एकजूटीने महासंकटावर मात करू – पालकमंत्री यशोमती ठाकूर

कोरोना संकटकाळाने सबंध देशाला चिंतेत टाकले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाशी आपण सगळेच विविध पातळ्यांवर लढत आहोत. अनेक नव्या अडचणी उभ्या राहिल्या. अनेक बाबी नव्याने उभाराव्या लागल्या. त्या उभारण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त आपण खंबीरपणे केली. अजूनही आपली लढाई संपलेली नाही आणि जिंकण्याची जिद्द कायम आहे. स्वातंत्र्य हे जबाबदारीसह येते. त्यामुळे स्वातंत्र्याचा मंगल सोहळा साजरा करताना नागरिक म्हणून स्वत:चे कर्तव्यभान जागृत ठेवण्याचा निर्धार आपण स्वातंत्र्यदिनानिमित्त केला पाहिजे.

या देशाने व महाराष्ट्राने यापूर्वीही प्रत्येक संकटाचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे. यापुढेही त्याच निर्धाराने या महासंकटातून आपण निश्चितपणे बाहेर पडू. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने खंबीरपणे लढण्याची व आवश्यक दक्षता घेऊन, एकमेकांना सुरक्षित ठेवण्याची व साथ देण्याची गरज आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन, विविध यंत्रणा अनेक आघाड्यांवर अहोरात्र लढत आहेत. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कामगार, अधिकारी, कर्मचारी जीवाची पर्वा न करता जोखीम पत्करून कोरोना प्रतिबंधासाठी लढत आहेत. रूग्णसेवा करताना अनेकदा अधिकारी-कर्मचारी स्वत:ही बाधित होतात. अशावेळी विलगीकरणात जाऊन योग्य उपचार घेऊन ते बरे होत आहेत आणि ठणठणीत झाल्यावर पुन्हा नव्या दमाने रुग्णसेवेच्या कार्यात सहभागी होत आहेत.

गेल्या पाच महिन्यात अनेक बाबी नव्याने उभाराव्या लागल्या. अत्यंत कमी कालावधीत जिल्हा कोविड रुग्णालय, त्यानंतर ठिकठिकाणी विलगीकरण केंद्रे, तालुका स्तरावरही कोविड रूग्णालय व हेल्थ सेंटर उभारण्यात आले. स्थानिक स्तरावर चाचणीची सोय होण्यासाठी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे लॅबही कार्यान्वित करण्यात आली. ॲन्टिजेन टेस्टची सुविधा ठिकठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली. जिल्ह्यात सातत्याने तपासणी मोहिमा घेण्यात आल्या. त्याद्वारे जिल्ह्यात २० लाखांहून अधिक नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. त्यामुळे तपासण्यांची संख्या वाढून कोरोना उपाययोजनांना गती मिळाली. आता शासनाने स्वतंत्र साथरोग नियंत्रण रूग्णालय उभारण्याचे नियोजन केले आहे.

ही आरोग्यविषयक कार्यवाही होत असताना लॉकडाऊन जारी असल्यामुळे नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी इतर आघाड्यांवरही गतीने प्रयत्न झाले. गरीब व वंचित व्यक्तींना अन्नधान्य वितरणाला सर्वदूर गती देण्यात आली. विविध योजनांतून सुमारे २५ लाख ४७ हजार लाभार्थ्यांना धान्यवितरणाचा लाभ देण्यात आला. गरजू व वंचित बांधवांसाठी केवळ ५ रुपये दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यात आली. याच काळात स्थलांतरित प्रवासी नागरिकांसाठी निवारा केंद्रे उभारण्यासह त्यांना स्वगृही पोहोचविण्यासाठी रेल्वे, वाहने उपलब्ध करुन देण्यात आली.

ग्रामीण भागात मनरेगाच्या माध्यमातून ‘मागेल त्याला काम’ उपलब्ध करून देण्यात आले. जिल्ह्यात ६९० गावांतून ३ हजार १२० विविध कामांना चालना देण्यात आली. प्रतिदिन मनुष्यबळ रोजगार निर्मिती ८६ हजारावर पोहोचून मनरेगा कामांमध्ये अमरावती जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.

राज्यात गेल्या १० वर्षात झाली नाही अशी विक्रमी कापूस खरेदी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्या तत्काळ दूर करण्यात आल्या. जीनची संख्या वाढविण्यात आली. प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले. सीसीआयमार्फत नवे केंद्र सुरू झाले. त्यामुळे कापूस खरेदीला वेग येऊन जिल्ह्यात सुमारे १३ लाख ५० हजार क्विंटलहून अधिक कापूस खरेदी झाली. केवळ कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्तीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली. सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही गतीने पूर्ण करण्यात आली. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. योजनेत आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख ६९ हजार ७०६ खातेदारांना लाभ मिळाला.

शेतकरी बांधवांना थेट बांधावर खत पुरवठा करण्यात आला. युरियाचा तुटवडा दूर करण्यासाठी १९ हजार २४८ मे.टन युरिया जिल्ह्यात सर्वत्र उपलब्ध करुन देण्यात आला. शेतकरी ते थेट ग्राहक योजना, ‘पोकरा’मध्ये दीड हजारहून अधिक लाभार्थ्यांना २ कोटी ६२ लाख अनुदान वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये ६ हजार २३९ शेतकरी बांधवांना ठिबक व तुषार संच देण्यात आले.

मेळघाटात कुपोषण निर्मूलनासाठी सुदृढ मेळघाट अभियान चिखलदरा व धारणी तालुक्यातील ३२४ गावांमध्ये राबविण्यात आले. सुमारे ३४ हजार ६४ बालकांची तपासणी करून आवश्यक तिथे बालउपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्रात उपचार करण्यात आले. जिल्ह्यातील दीड लाखाहून अधिक बालके व सुमारे ३३ हजार माता यांना नियमित घरपोच आहार पुरविण्यात आला. त्याशिवाय, महिलांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट ठेऊन प्रत्येक जिल्ह्यात महिला व बालविकास भवन स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

कोरोनाचे संकट आले तरीही विकासाची प्रक्रिया थांबलेली नाही. प्रत्येक नव्या अडचणीवर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न होत आहे. विकासाची ही प्रक्रिया गतिमान झाली असताना कोरोनावर मात करुन पुन्हा नव्या दमाने झेप घेण्यासाठी या प्रयत्नांना आता आपणा सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. सर्वांनी या देशाप्रती, आपल्या स्वातंत्र्याप्रती, लोकशाहीप्रती एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाळण्याचा निर्धार या स्वातंत्र्यदिनानिमित्त करुया. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !

ॲड. यशोमती ठाकूर,
महिला व बालविकास मंत्री,
तथा पालकमंत्री, अमरावती जिल्हा