अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15– समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करताना दिसले, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.
अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापनदिनी मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी मैनक घोष, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी व कोरोना या संकटात दुर्देवी मृत्यू झालेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
उपस्थितांना संबोधताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, आपले स्वातंत्र्य अबाधित राहावे, यासाठी आपले जवान देशाच्या सीमेवर रात्रंदिवस जागता पहारा देत आहेत. त्यामुळेच आपण आज सुरक्षित आहोत. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, हे आपलं कर्तव्यचं आहे.
यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यावर कोरोनाचं सावट आहे. गेले पाच महिने आपण सगळेच या विषाणूशी सर्व साधनसामुग्रीसह एकवटून लढतोय, त्यात यशस्वी देखील होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपले राज्य विविध आघाड्यांवर मार्गक्रमण करीत आहे. समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, उद्योजक या सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध आहे.
महाराष्ट्र हे देशातील नव्हे तर जगातील सर्वोच्च व सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारे राज्य घडविण्याचा संकल्प आपले आदरणीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळानं केला आहे. या संकल्पपूर्तीसाठी मी या जिल्ह्याची पालकमंत्री या नात्याने कटिबध्द आहे. कोरोना संकटाच्या सुरुवातीच्या काळापासूनच आपण जिल्ह्यातील सर्व आरोग्य व्यवस्था तत्पर ठेवण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला असून कोरोनाची तपासणी करण्यासाठी लवकरच जिल्हा रुग्णालय येथे सुसज्ज अशी आरटीपीसीआर प्रयोगशाळाही सुरु करण्यात येत आहे.
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत करावी, यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ओएनजीसी, उरण, एमआयडीसी असोसिएशन, महाड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, महाड, रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन, रोहा, स्वदेश फाऊंडेशन, रिलायन्स यासारख्या उद्योग समूहांनी मदतीचा हात पुढे केला, त्यांचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी आभार मानले.
शिवभोजन थाळी योजनेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी केवळ पाच रुपयांत शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात 98 शिवभोजन केंद्रांना 17 हजार 300 शिवभोजन थाळी मंजूर असून या शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून दररोज जवळपास 16 हजार गरजूंना जेवण मिळत आहे. याशिवाय कम्युनिटी किचनसारख्या उपाययोजनांमधून गरजूंना जेवण देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली.
कोरोना पाठोपाठ जिल्ह्यावर निसर्ग चक्रीवादळाचे संकट आले. या संकटात सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या माध्यमातून एनडीआरएफ, भारतीय तटरक्षक दल, रायगड जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलातील सदस्य संस्था, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक, पोलीस विभाग, महसूल विभागाच्या मदतीने जिल्ह्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन प्रसंगी सर्व विभागांशी समन्वय साधल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी टाळण्यास यश आले, याबद्दल पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी विविध शासकीय यंत्रणांच्या योग्य समन्वयामुळे हे शक्य झाले, असे सांगत त्यांचे कौतुक केले.
अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 रुग्ण खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरू करण्याबाबत मान्यता देण्यात आली असून लवकरच सर्व सोयी-सुविधायुक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अस्तित्वात येईल. याशिवाय लवकरच मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया या सागरी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल मेडीकल युनिटसह बोट अँम्बुलन्स सेवा बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित होणार आहे, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विशेष आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’चा उल्लेख करुन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी एक देश म्हणून एकत्रितपणे या संकटाचा मुकाबला करताना देशाला आर्थिक समस्या भेडसावत आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत पाच खांबांवर उभा राहील. ते पाच खांब म्हणजे – अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित व्यवस्था, आपली डेमोग्राफी आणि मागणी. या अभियानासाठी भारताच्या GDP च्या 10 टक्के रक्कम म्हणजे 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची त्यांनी घोषणा केली. हे पॅकेज 2020 मध्ये या अभियानाला नवी गती देईल, असे सांगितले.
जिल्ह्यातील विकास कामांबाबत बोलताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सांगितले की, कोकणातील पर्यटन वाढीसाठी शासनाने बीच शॅक पॉलिसी सुरु करण्याचा घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे स्थानिकांना पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होणार आहे तसेच यातून सागरी किनारपट्टयांवर स्थानिकांच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय भरभराटीस येईल. त्याचप्रमाणे रेवस ते रेडी सागरी महामार्गाच्या कामासाठी शासनाने 4 हजार 500 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली असून रेवस, करंजा, अलिबाग, नांदगाव, मुरुड, दिघी, दिवेआगर, शेखाडी मार्गे रेडी या भागातून हा सागरी महामार्ग जाणार आहे. यामुळे येथील पर्यटन विकासाला नवीन आयाम प्राप्त होणार आहे.
यावेळी केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या निर्देशानुसार गंदगीमुक्त भारत अभियानाच्या निमित्ताने स्वच्छतेची शपथ घेण्यात आली व प्रत्येकजण स्वच्छतेप्रती जागरुक राहून स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे जीवन सुसह्य होण्यास हातभार लावू, असा संकल्प या निमित्ताने करण्यात आला.
एकविसावं शतक भारताचं असेल, हे निव्वळ स्वप्न नाही तर ती आपली सर्वांची आपल्या देशाप्रतीची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने देशाच्या विकासाला हातभार लावला पाहिजे व त्यासाठी आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे असे सांगून आजपासून प्रत्येक नागरिकाने स्थानिक उत्पादने विकत घेण्याचा आणि त्यांचा प्रचार करण्याचा निश्चय करुया, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी नागरिकांना केले.
कोरोनाच्या सुरुवातीच्या संचारबंदी काळात आलेले सर्व जातीधर्माच्या बांधवांनी सण, उत्सव अतिशय साधेपणाने साजरे करून जिल्हा प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. तसेच आगामी काळातही गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व अन्य सणांच्या काळात देखील जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे, सूचनांचे पालन करून साधेपणाने व सामंजस्याने हे सर्व उत्सव साजरे करावेत, असे नागरिकांना आवाहन करीत जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या सूचनांचा, माहितीचा योग्य प्रकारे प्रचार व प्रसार करून समाजाला उपयुक्त अशी मदत केली आहे, याबद्दल पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांचेही मनःपूर्वक आभार मानले.
मिशन बिगिन अगेनमुळे निर्बंध शिथिल होत असले तरी संकट टळलेले नाही. एकीकडे दैनंदिन कामकाज सुरु ठेवणे आवश्यक आहे तर दुसरीकडे कोरोनापासून लोकांचे रक्षण करणे, हे देखील महत्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने सामाजिक सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर या चतुःसूत्रीचा दैनंदिन जीवनात अंगीकार करावा, शासन सदैव आपल्या सोबत आहे असे सांगून सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात रायगड जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करताना दिसेल, असा विश्वास व्यक्त करीत पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुनःश्च एकदा सर्व जिल्हावासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा तसेच
पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा, सामाजिक संस्थांचा, व्यक्तींचा व प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपनियंत्रक नागरी संरक्षण दल, उरण एम.के.म्हात्रे, स्वयंसेवक रायगड आपत्ती प्रतिसाद दल, उरण सलिम नूर शेख, मावळा प्रतिष्ठा अलिबाग, मानस कुंटे, ऑल इंडिया रिहॅबिलिटेशन फोरम, डॉ.सय्यद साजिद, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, महाड डॉ.भास्कर जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी, महाड, डॉ.इजाज बिरासदार, जैन श्वेतांबर ट्रस्ट कर्जत, उपजिल्हा रुग्णालय, कर्जत, डॉ.सुप्रिया घोसाळकर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, माणगाव डॉ.तुषार शेठ, सर्वविकास दिप संस्था, माणगाव, फादर रिचार्ड, स्वदेश फाऊंडेशन माणगाव, तुषार इनामदार, रामेश्वर कन्स्ट्रक्शन, पेण, राजू पिचिका, अहिल्या महिला मंडळ, पेण, श्रीम.अश्विनी गाडगीळ, सामाजिक कार्यकर्ता वडवळ, ता.खालापूर, जितेंद्र सकपाळ, सामाजिक कार्यकर्ता, खालापूर संतोष गुरव, हॅम ऑपरेटर, नेरुळ, पनवेल, अमोल देशपांडे व ग्रुप, हॅम ऑपरेटर, अलिबाग दिलीप बापट, लिपिक,तहसिल कार्यालय, मुरुड, सुग्रिव वसंत वाघ, राजू बाबूलाल भोये, तळा तालुका रास्त भाव दुकानदार संघटना, रमेश गजानन कोलवणकर, तळा तालुका पत्रकार संघ, साळुंखे रेस्क्यू ग्रुप, महाड, प्रशांत साळुंखे, निवासी नायब तहसिलदार, पोलादपूर, समीर देसाई, लिपिक, भाले, ता.माणगाव, सागर खानविलकर, तहसिल कार्यालय, पोलादपूर,आर.डी.केकाण, दै.लोकसत्ता, जिल्हा प्रतिनिधी, अलिबाग, हर्षद कशाळकर, दै.पुढारी, रायगड आवृत्ती प्रमुख जयंत धुळप, जेम्स ॲण्ड ज्वेलरी असोसिएशन, मुंबई, मेहूल शाह, लाईफ फाउंडेशन श्रीमती पूनम ललवाणी, डॉ.साठे, अलिबाग, आर.के.हॉस्पिटल, चोंढी, डॉ.आर.के.पाटील, मानस मित्र, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती रायगड, मोहन भोईर.
कोविड योद्ध्यांचा मरणोत्तर सन्मान
नायब तहसिलदार, रोहा, कै.संजय नागावकर, अंगणवाडी सेविका केळवणे-1, ता.पनवेल, कै.नंदा ठाकूर, ग्रामपंचायत कणे, ता.पेण कै.हरिश्चंद्र शंकर म्हात्रे.
कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर या सोहळयात उपस्थित सर्वांनी सॅनिटायझरचा वापर, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या सूचनांचे काटेकोर पालन करीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते.