सेलू कोरोना केअर सेंटरचा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबवावा

0
9

पालकमंत्री नवाब मलिक यांचे निर्देश

परभणी, दि. 15 : जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज असून कोरोनाग्रस्त रुग्णांचे मनोबल वाढविणे खूप गरजेचे आहे. ते कार्य विविध उपक्रमांच्या माध्यमातून सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या कोरोना केअर सेंटरने केले आहे. त्यामुळे सेलू कोरोना केअर सेंटरचा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबवावा, असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात  कोव्हिड-19 बाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, महापालिका आयुक्त देविदास पवार आदीची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री.मलिक म्हणाले की, सेलू उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहातील कोरोना केअर सेंटरचा उपक्रम स्तुत्य असून तेथे रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व सोयी- सुविधांचा अभ्यास करून इतर ठिकाणी त्याचा तातडीने अवलंब करावा. वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे हे कोरोना रुग्णांना देत असलेल्या सर्व सोयी-सुविधेबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी त्यांचे कौतुक केले.

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या परंतु कुठलेही लक्षणे न जाणवणाऱ्या रुग्णांना त्यांच्या घरात स्वतंत्र टॉयलेट, बाथरूमसह रूम उपलब्ध असेल तर त्यांना घरात राहूनच उपचार देण्यात यावेत, तसेच त्यांच्या घराबाहेर तसा फलक लावण्यात यावा. जिल्ह्यात जास्तीत जास्त होम क्वारंटाईनला प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना केली. लॉकडाऊनपासून जिल्ह्यातील बंद असलेल्या चहा स्टॉल व पान स्टॉलला चार व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती जमणार नाहीत व फिजिकल डिस्टन्ससह इतर सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून परवानगी देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी  कोरोनाबाबत जिल्ह्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांची व भविष्यातील नियोजनाची सविस्तर माहिती यावेळी दिली. तसेच सेलू येथील कोरोना केअर सेंटरमध्ये राबविण्यात आलेले उपक्रम व देण्यात येत असलेल्या सुविधा योगा, नृत्य, संगीत, नाश्ता, भिजविलेले बदाम, ग्रीन टी, काढा, सकस आहार आणि समुपदेशन आदीबाबत सविस्तर माहिती सेलू उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय हरबडे यांनी संगणकीय सादरीकरण व दृक-श्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून दिली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here