सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांची पंडित जसराज यांना श्रद्धांजली
मुंबई, दि.17 : सुमधुर आवाजाची देणगी मिळालेले पंडित जसराज यांनी भारतीय संगीतासाठी आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतले होते. भारतीय संगीत आणि पंडित जसराज हे जणू समीकरणच बनले होते. पंडित जसराज यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातला तारा निखळला असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
श्री.देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, पंडित जसराज यांचे वडील मोतीराम हेसुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. पंडितजींना आपल्या वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला. संघर्ष, मेहनत आणि रियाझ यातून भारतीय संगीत सृष्टीला त्यांनी योगदान दिले. आपल्या गायनातून श्रोत्यांना ईश्वर अनुभूती देणारे, देश-विदेशातल्या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणारे पंडितजी हे संगीत क्षेत्रातले गान गुरु होते. शास्त्रीय गायनासाठी त्यांना आजपर्यंत अनेक सन्मान, पुरस्कार मिळाले असून केंद्र शासनाने पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.