वांद्रे येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ठिकाणी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट

मुंबई, दि. १८ : वांद्रे येथे काल एका रिकाम्या इमारतीचा भाग कोसळला होता. आज सकाळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ठिकाणी भेट देऊन चालू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला.

दुर्घटनेत दोन व्यक्ती जखमी झाल्या होत्या, त्यापैकी एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे योग्य ती मदत करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच दुसऱ्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी दिली. मृत व्यक्तिच्या कुटुंबास ४ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, तर जखमी व्यक्तिस नियमानुसार अनुदानाची रक्कम देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली.