चंदन वृक्ष लागवड, वृक्षतोड, वाहतूक आणि विल्हेवाटीबाबत वेबिनारचे आयोजन
मुंबई दि. 19: – चंदन वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. चंदन वृक्षतोड, वाहतूक व विपणनाच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील. त्यासाठी कायद्यात व नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असे प्रतिपादन वनमंत्री संजय राठोड यांनी केले. चंदन वृक्ष लागवड, वृक्षतोड, वाहतूक आणि विल्हेवाट बाबत आयोजित वेबिनारचे उद्घाटन आज मंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
चंदन वृक्ष लागवड वरदान ठरेल
वनमंत्री श्री. राठोड म्हणाले,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस होतो. कधी दुष्काळ तर कधी पूर परिस्थिती असते. अशा वेळी शेतकर्यांना चंदन वृक्ष लागवड निश्चित वरदान ठरू शकते.शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी त्याची मदत होऊ शकेल व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.
कन्या वन समृद्धी योजनेच्या माध्यमातून जन्म झालेल्या मुलीच्या नावाने 10 रोपे लागवड करावयाची आहेत. त्यात चंदनाची लागवड करता येईल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थींच्या शेताच्या बांधावर व शेतजमिनीवर सामाजिक वनीकरण शाखेमार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येतो. या योजनेअंतर्गत 31 प्रजातींची वृक्षलागवड करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यात चंदनवृक्षाचा सुद्धा समावेश आहे. राज्य शासनाच्या अशा विविध योजनांच्या माध्यमातून चंदन वृक्ष लागवड करता येऊ शकेल अशी माहितीही मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी दिली.
यावेळी मुख्य महाव्यवस्थापक (नियोजन) एफ.डी.सी.एम.लि, नागपूर एम. श्रीनिवास राव यांनी भारतातील मुख्य चंदन उत्पादक राज्यांमधील तरतुदींविषयी माहिती दिली. आय.डब्ल्यू.एस.टी. बंगलोरचे विभाग प्रमुख डॉ. सुंदर राज यांनी चंदन लागावडीविषयक तांत्रिक बाबीविषयक सादरीकरण केले तसेच वनसंरक्षक (वन विनियमन), नागपूर श्री. एस. एस. दहिवले यांनी चंदन तोड व वाहतुकीविषयक सर्व बाबींबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
या वेबिनारमध्ये चंदन वृक्ष लागवड केलेले व लागवड करण्यास इच्छुक असलेले शेतकरी, चंदनाचे वापर करणारे उद्योजक, राज्यातील वन अधिकारी व कर्मचारी, यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. राज्यातील सर्व भागातून सहभागी शेतकरी व उद्योजकांनी या बाबतीतील शंका व सूचना सविस्तर मांडल्या व वन विभागाच्या वतीने एम. श्रीनिवास राव, मुख्य महाव्यवस्थापक (नियोजन), एफ.डी.सी.एम.लि, नागपूर व एस. एस. दहिवले , वनसंरक्षक (वन विनियमन) यांनी शेतकरी बांधवांच्या सर्व शंकाचे निरसन केले.
यावेळी विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) डॉ. एन. रामबाबू, , प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) प्रविण श्रीवास्तव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) मोहन कर्नाट, आदी मान्यवर उपस्थित होते.
00000
देवेंद्र पाटील / वि.सं. अ.