भंडारा दि. २१:- जिल्ह्यातील विविध भागामध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणात काही गावांना तसेच वस्त्यांना बसलेला आहे. आज लाखनी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या भागांना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः भेट देऊन आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
याप्रसंगी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सर्व विभागाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. ज्यांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेले असून अन्नधान्य देखील खराब झालेले आहे त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय सुद्धा करण्याचे आदेश तातडीने देण्यात आलेले आहेत. या पाहणी दौऱ्यात श्री. पटोले यांनी प्रभावित नागरिकांची भेट घेऊन त्यांना शासन आपल्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
सर्व जनतेला विनंती आहे की कृपया काळजी घ्यावी, विशेष करून लहान मुलांची काळजी घ्यावी. कुठलेही साथीचे रोग पसरू नयेत यासाठी योग्य दक्षता घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला देखील देण्यात आलेले आहेत तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक असलेले सर्व संपर्क क्रमांक 24 तास सुरु ठेवा असे निर्देश नाना पटोले यांनी प्रशासनाला दिले.