छत्रपती शिवाजी महाराजांकडून लढण्याचा आणि जिंकण्याचा गुण आत्मसात केला पाहिजे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आणि कार्डियाक अँब्युलन्सचे लोकार्पण

पुणे, दि. २१ –  अन्‍यायाविरुध्‍द लढण्‍याचे तेज ज्‍या मातीत रुजले आहे त्‍या मातीचा आशीर्वाद आपल्‍या पाठीशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या वास्‍तव्‍याने पावन झालेली नगरी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम या भूमीत आपल्याला बघायला मिळतो. या पट्ट्यात अनेक महान संत, क्रांतीकारक होवून गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अन्यायाविरुध्द लढण्याची शिकवण दिली आहे. त्यांच्याकडून आपण लढण्याचा व जिंकण्याचा गुण आत्‍मसात केला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग केला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

जिल्‍ह्यातील आंबेगाव तालुक्‍यातील मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार नूतनीकरण कामाचे व कार्डियाक अँब्युलन्सचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते झाले. त्‍यावेळी ते बोलत होते. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्‍यासह इतर नागरिक ऑनलाईन उपस्थित होते.

मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे म्‍हणाले, नागरिकांनी प्रशासनाला कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सहकार्य करावे. कोरोना विषाणूला जवळ येवू न देण्यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, प्रत्‍येकाने  मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता करण्यावर भर देणे, संकटकाळात एकमेकांना मदत करणे यावर लक्ष दिले पाहिजे. तसेच प्रत्येक गावात कोरोना दक्षता समित्या स्थापन करुन त्यांच्या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला पाहिजे असे सांगून या विषाणूवर अद्यापर्यंत कोणतेही औषध, लस बाजारात उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. गणेशोत्सव काळात नागरिकांनी विनाकारण गर्दी करु नये, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी श्री गणेशाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राज्‍य, देश तसेच जगावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर नष्ट होऊ दे, सर्व कोरोनामुक्त होवू दे, असे साकडे घातले. प्रारंभी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्व. किसनराव बाणखेले यांचे स्मरण  केले, तसेच जुन्‍या आठवणींना उजाळा देवून कार्यक्रमाची सुरुवात केली.

कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, मंचर नगरीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल, असा हा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा मंचरच्‍या वैभवात भर घालणारा असून तो सर्वांनाच प्रेरणा देत राहील. कोरोना विषाणूच्या संकटकाळात मोहरम व गणेशोत्सव सण साजरे करतांना नागरिकांनी कुठेही गर्दी करु नये, सामाजिक अंतर राखावे, वारंवार हात धुवावे, घराबाहेर पडतांना मास्कचा न चुकता वापर करावा, स्वयंशिस्त पाळावी. या काळात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन उत्तम काम करीत असून नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले. ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्‍या कार्डियाक अँब्युलन्सचा उपयोग तालुक्‍यातील नागरिकांना होईल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मनोगतात मंचरमधील घटनांना उजाळा दिला. ते म्‍हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 1978 साली मंचर येथे (ता.आंबेगाव, जि.पुणे) छत्रपती शिवाजी महाराज वेशीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला होता. त्‍यानंतर तब्बल 42 वर्षांनी या वेशीचे भव्यदिव्य महाद्वारामध्ये रूपांतर करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत निधीतून ग्रामपंचायतीने सुमारे 28 लक्ष रूपयांची कार्डियाक अँब्युलन्स खरेदी केलेली आहे. या अँब्युलन्समध्ये व्हेंटीलेटर, डिफायब्रीलेटर, ऑक्सीजन मशीन, मॉनिटर्स आदी कोरोनाविरोधात लढण्यासाठी सुसज्ज मशीन्‍स बसविण्यात आल्या आहेत. याचा उपयोग कोरोनाविरुध्‍दच्‍या लढाईत होईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी केले. आभार वसंतराव बाणखेले यांनी मानले.