विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
7

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथून नागपूरला हलविण्याच्या निर्णयाबाबत दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची बैठक घेणार – पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील

मुंबई, दि. 23 : अकोला जिल्ह्यातील मागील 18 वर्षांपासून कार्यरत असलेले महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथून नागपूरला हलविण्याच्या निर्णयाबाबत दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

अकोला येथील पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय नागपूर येथे हलविण्यात आल्या संदर्भात सदस्य अमोल मिटकरी यांनी विचारलेल्या प्रश्नाला  उत्तर देतांना मंत्री श्री विखे पाटील बोलत होते.

या प्रश्नाच्या वेळी सदस्य सर्वश्री डॉ. परिणय फुके, डॉ. रणजित पाटील, एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

000

राज्यातील तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे पंधरा दिवसात भरणार – क्रीडा मंत्री गिरीश महाजन

राज्यातील क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे 15 दिवसाच्या आत भरली जातील अशी माहिती क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना क्रीडा मंत्री श्री महाजन बोलत होते.

क्रीडा मंत्री श्री. महाजन  म्हणाले , महाराष्ट्र शासनाने 2003 च्या शासन निर्णयाद्वारे तालुका क्रीडा संकुले उभारण्याचा धोरणत्मक निर्णय घेतला असून राज्यात 380 तालुका क्रीडा संकुले मंजूर आहेत. सद्य स्थितीत राज्यात 100 क्रीडा अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून यापैकी फक्त 20 टक्के पदे भरलेली आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन येत्या आठवड्यात नागरी सेवा मंडळाची तातडीने बैठक घेऊन 44 पदे भरली जाणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 15 पदांची मुलाखत प्रक्रिया या महिनाअखेर पूर्ण होईल. अशी 69 पदे उपलब्ध होणार असल्याचेही श्री महाजन यांनी सांगितले.

राज्यातील जुन्या आणि नवीन तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलांना देण्यात येणाऱ्या निधीच्या तरतुदीमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच दर्जेदार आणि चांगल्या प्रतीचे क्रीडा साहित्य खरेदी करण्यात येणार असल्याचेही श्री महाजन यांनी यावेळी सांगितले.

राज्यामध्ये क्रीडा धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘सी एस आर’ च्या माध्यमातून  क्रीडा प्रकारांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून घेण्याबाबतही विचार करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रश्नाच्या वेळी सदस्य सर्वश्री भाई जगताप, सचिन अहिर, राम शिंदे, संजय आजगावकर, सतीश चव्हाण, अनिकेत तटकरे, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला.

000

विना परवानाधारक परप्रांतीय मासे विक्री व्यवसाय करीत असल्याच्या  प्राप्त  तक्रारीच्या अनुषंगाने

विधानपरिषदेतील सदस्यांची समिती गठीत करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्यात विना परवानाधारक परप्रांतीय मासे विक्री व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने विधानपरिषदेतील सदस्यांची समिती गठीत करण्यात येणार असून त्या समितीने शासनाला शिफारशी सादर कराव्यात असे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत सांगितले.

नवी मुंबईतील  परप्रांतीयाकडून  विनापरवाना मच्छी  विक्री करण्यात येत असल्याबाबत विजय उर्फ भाई गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना श्री. मुनगंटीवार  बोलत होते.

मासेमारी विक्री परवाने ‘मनपा’कडून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिले जातात.विना परवाना मासे विक्री होत असल्यास मत्स्यव्यवसाय विभागाकडून मनपा आयुक्तांना  या अनुषंगाने उचित कार्यवाही आणि कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात येतील. या संदर्भातील नियम अवलोकन करण्यासाठी विधानपरिषद सदस्यांची समिती तयार करण्यात येईल, असेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

या प्रश्‍नाच्या वेळी सदस्य सर्वश्री भाई जगताप, शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here