तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र शिक्षणातील उत्तमतेला चालना देणारे केंद्र बनावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
12

पुणे, दि. २३ : तंत्रशास्त्र किंवा आरोग्यसारख्या एखाद्या विशेष शाखेच्या विद्यापीठाची निर्मिती त्या क्षेत्रातील विशेष अभ्यासक्रम राबविण्यासाठी करण्यात येते. त्यामुळे अशा प्रादेशिक केंद्राच्या माध्यमातून इतर विद्यापीठांशी जोडलेल्या शैक्षणिक संस्थांना लाभ होईल. त्यादृष्टीने सुरू करण्यात आलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र शिक्षणातील उत्तमतेला चालना देणारे केंद्र बनावे, अशी अपेक्षा असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेच्या प्रादेशिक केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, कार्यकारी परिषद सदस्य डॉ.विवेक वडके, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.भगवान जोगी आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, आज तंत्रशिक्षणात वेगाने प्रगती होत आहे. या क्षेत्रातील ज्ञानाकडे बारकाईने लक्ष दिले गेले नाही तर जगात आपण मागे पडू. त्यामुळे विद्यापीठांनी परस्पर सहयोगाद्वारे तंत्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तांत्रिक ज्ञानाच्या क्षेत्रात देश समर्थ करण्याच्यादृष्टीने नव्या ज्ञानाबाबत विद्यार्थ्याला अद्ययावत करण्यासाठी प्रादेशिक केंद्र महत्वाचे ठरतात.

शासन स्तरावर विद्यापीठांमधील परस्पर सहकार्यासाठी प्रयत्न  करण्यात येत आहे.  महाराष्ट्राने विविध क्षेत्रात देशाला दिशा दिली आहे.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठात तंत्रशास्त्र विद्यापीठाचे केंद्र सुरू  होत  आहे. शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येकाने ध्येय समोर ठेऊन परिपूर्णतेसाठी प्रयत्न केल्यास महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात नेहमी पुढे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानयुक्त उपकरणे, वस्तू बनवल्या जातात. त्या प्रत्यक्ष बाजारात आणि व्यवहारात उपयोगात येण्याच्यादृष्टीने त्यामध्ये अचूकता आणण्यासाठी शिक्षक, प्राध्यापकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही श्री. कोश्यारी यांनी केले.

कुलगुरू डॉ.काळे म्हणाले, २०१४ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची स्थापना झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापनाने प्रादेशिक केंद्रासाठी ८ हजार ५०० चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्यावतीने केंद्रासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. विद्यापीठाने तंत्रज्ञान संबंधीत क्षेत्रातील अभ्यासक्रमावर भर दिला आहे. यावर्षी एमटेक इन सायबर सिक्युरीटी आणि एमटेक इन रिमोट सेन्सिंग ॲण्ड जीआयस या अभ्यासक्रमासह आणखी इतर दोन नवे अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर योगदान द्यावे यासाठी विद्यापीठ प्रयत्नरत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली

श्री.पांडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. उपकेंद्र हे विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी उपयुक्त असून विद्यार्थ्यांसह शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येकाला त्याचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, कार्यकारीणी सदस्य, शैक्षणिक परिषदेचे सदस्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here