विधानसभा प्रश्नोत्तरे

0
9

डोंबिवली येथील खोणी आणि शिरढोण गावात म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात

आलेल्या सदनिकांचे काम प्रगतीपथावर  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 23 :  ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील खोणी आणि शिरढोण गावात म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात  येणा-या सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून त्या लवकरच पूर्ण होत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील खोणी आणि शिरढोण गावात म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांचा ताबा मिळण्याबाबत विधानसभा सदस्य कालिदास कोळंबकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील खोणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ६ हजार ३३८ घरकुलांना केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीने २८ एप्रिल २०१६ ला मान्यता दिली. प्रत्यक्ष जमिनीचा ताबा २० ऑक्टोबर २०१७ ला मिळाला. त्यानंतर  मंजूर अभ्यन्यासातील  १६ इमारतीतील ४ हजार ४४८ अत्यल्प उत्पन्न गटातील घरकुलांचे बांधकाम जानेवारी २०१८ पासून हाती घेण्यात आले. ॲडव्हान्स कॉन्ट्रीब्युशनची ही योजना असल्यामुळे या योजनेची लॉटरी काढण्यात आली आणि वेगवेगळया ट्प्प्यांवर त्याचे पैसे भरणे आवश्यक होते.  या सोडतीमध्ये यातील  यशस्वी १ हजार ४४६  लाभार्थींपैकी  २३८ लाभार्थींनी १०० टक्के रक्कम भरली १८७ लाभार्थींनी  पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम भरली. यातील आठ इमारती २०२४ या वर्षी पूर्ण होणार आहेत तसेच काही इमारतीना भोगवटा प्रमाणपत्र मिळाला आहे. शिरढोण येथील काही इमारती २०२२ मध्ये पूर्ण होतील. कोरोनाच्या काळात सर्व प्रकारची बांधकामे बंद असल्यामुळे ही कामे बंद होती. ही कामे आता सुरू असून लवकरच पूर्ण होतील अशी महिती उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

000

साकवाचे रूपांतर पूलांमध्ये करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार  सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई, दि. 23 : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पुल दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून राज्यात अनेक साकव वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे लक्षात येत असल्याने साकवांचे रूपांतर पुलांमध्ये करण्यासाठी शासनस्तरावर  सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याबाबत  सदस्य योगश कदम यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अजित पवार, भास्करराव जाधव यांनीही सहभाग घेतला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण म्हणाले, दापोली तालुक्यातील पूल वाहतुकीसाठी सुरक्षित व्हावा यासाठी नव्याने निधीची तरतुद करण्यात येईल तसेच राज्यात अशाच प्रकारे साकवांचे रूपांतर पूलांमध्ये करण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही श्री.चव्हाण यांनी स्पष्ट केले.

000

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत उपाययोजना करणार  सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई, दि. 23 : मुंबई -वडोदरा एक्सप्रेस-वेचे काम करणाऱ्या कंपनीने रस्त्याचे काम करताना नैसर्गिक नाले बंद केल्याबाबतच्या तक्रारीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना भरपाईसाठी उपाययोजना करू अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

मुंबई -वडोदरा एक्सप्रेस-वेचे काम करणाऱ्या कंपनीने रस्त्याचे काम करताना नैसर्गिक नाले बंद केल्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य श्रीनिवास वनगा यांनी उपस्थित केला होता त्याचे उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, मुंबई -वडोदरा एक्सप्रेस-वेचे काम करणा-या कंपनीने रस्त्याचे काम करताना नैसर्गिक नाले बंद केल्यामुळे पालघर जिल्ह्यातील सफाळे पूर्व भागातील नावझे, गिराळे, साखरे, पारगाव, वनघर, घाटीम ग्रामपंचायत हद्दीतील शेती पावसाळ्यात पाण्याखाली जावून शेतीच्या नुकसानीच्या तक्रारी प्राप्त आहेत, त्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असे श्री.चव्हाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here