शेतकऱ्यांचे कल्याण आणि विकासामध्ये डॉ. भाई केशवरावजी धोंडगे यांचे योगदान मोठे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,  दि. 24 : मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार हीच जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांनी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी काम केले आहे. दांडगा जनसंपर्क असलेले लोकप्रतिनिधी, साहित्याचे जाणकार, अभ्यासू लेखक आणि व्यासंगी पत्रकार असलेल्या धोंडगे यांचे कार्य, योगदान मोलाचे असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत काढले.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांच्या संसदीय कार्याचा गौरव करण्याचा प्रस्ताव उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडला. हा प्रस्ताव सभागृहाने एकमताने संमत केला. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सभागृहात भाई बोलायला लागले की विरोधी पक्षानेही कान टवकारून ऐकावे असे त्यांचे सभागृहातील निवेदन असे. जातीपातीच्या जोखडातून समाज मुक्त व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते आणि आहेत. अंधश्रद्धा आणि त्यामुळे येणारी सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक गुलामगिरी यातून भोळ्याभाबड्या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी समाजजागृतीचे कार्य केले. छत्रपतींचा राष्ट्राभिमान, मुत्सद्दीपणा, लोकसंग्रह, महात्मा गांधींची निःस्वार्थ, निरपेक्ष सेवावृत्ती, लोकमान्यांचा कर्मयोग आणि कर्मयोगावर आधारलेली समाजरचना घडवण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला.  उपेक्षित समाजाला जगण्याचा हक्क त्यांनी मिळवून दिला.

डॉ. भाई केशवरावजी धोंडगे यांनी 1957, 1962, 1967, 1972, 1985, 1990 अशा तब्बल सहा विधानसभा निवडणुका जिंकल्या. एक अभ्यासू आणि लढवय्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली. त्यानंतर 1975 च्या आणिबाणीनंतर 1977 मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत दिल्लीतही आपल्या वक्तृत्वाची चुणूक दाखविली, असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील लोकसाहित्याचे अभ्यासक असलेल्या श्री.धोंडगे यांनी मुक्ताईसुत या नावाने विविध प्रकारचे विपुल लेखन केले आहे. ग्रामीण भागातील लोककलावंताला व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून ते सातत्याने जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचे आयोजन करतात. १९५७ ते १९९५ अशा दहा निवडणुका आणि ११ मुख्यमंत्री पाहिलेले केशवराव धोंडगे यांनी ४० पुस्तके लिहिली आहेत. विधिमंडळात त्यांनी भाषणे, औचित्याचा मुद्दा, तारांकित प्रश्न, लक्षवेधी ही सारी आयुधे वापरत भल्याभल्यांची भंबेरी उडवली, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

या प्रस्तावावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री विक्रम काळे, एकनाथ खडसे, जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

००००