विधानसभा प्रश्नोत्तरे 

अपघातात मृत्यू पावलेल्या कामगाराच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य – सुधीर मुनगंटीवार

 

मुंबई, दि. 25 : दक्षिण मुंबईतील बोहरी मोहल्ला येथील इमारतीचे बांधकाम सुरू असताना लिफ्ट कोसळून मोहम्मद विश्वरवी अब्दुल सय्यद यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबियांना सात लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली असल्याची माहिती वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.

दक्षिण मुंबईतील बोहरी मोहल्ला, भेंडीबाजार येथील इमारतीचे बांधकाम सुरू असताना लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत सदस्य रवींद्र वायकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, कमीत कमी 90 दिवस काम केले असल्यास कामगार कल्याण मंडळात नोंदणी करण्यात येते. परंतु मृत कामगाराचे प्रत्यक्ष क्षेत्रात नियमानुसार कामाचे दिवस पूर्ण न झाल्याने नोंदणी करण्यात आली नव्हती. अपघातासंदर्भात संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारची कोणतीही घटना यापुढे घडू नये, यासंदर्भात दक्षता घेण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला दिले असल्याची माहितीही श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

000

वाशिममधील रस्ते, पुलाची दुरूस्ती प्राधान्याने करणार – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 25 : वाशिम जिल्ह्यातील खापरदरी ते सावरगाव कान्होबा येथील नादुरूस्त रस्ता विशेष दुरूस्ती अंतर्गत निधी उपलब्ध करून त्याचे काम प्राधान्याने करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत राजेंद्र पाटणी यांनी खापरदरी ते सावरगाव कान्होबा येथील नादुरूस्त रस्त्याचे आणि पुलाचे बांधकाम करणेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना मंत्री गिरीष महाजन बोलत होते. यावेळी सदस्य राजेश टोपे यांनी सहभाग नोंदविला.

श्री. महाजन म्हणाले, सावरगाव ते खापरदरी हा ग्रामीण रस्ता ४.२० किलोमीटर लांबीचा आहे.  रस्त्याची व पुलाची दुरूस्ती करणे आवश्यक असून, विशेष बाब म्हणून दीड कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून या रस्त्याची व पुलाची दुरूस्ती करण्यात येईल. राज्यातील अत्यंत खराब रस्ते प्रथम या प्राधान्यक्रमाने रस्ता दुरूस्ती करण्यात येणार असल्याचीही माहिती मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिली.

०००