देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान काल, आज आणि उद्याही राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 25 :-  देशाच्या विकासात महाराष्ट्राने कायम योगदान दिले आहे.  महाराष्ट्राचे  काल, आज असलेले योगदान हे उद्याही कायम राहील, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा सभागृह नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

            उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मांडलेल्या चर्चेच्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

               उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, समाज हाच संस्कृती आणि राष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा आधार आहे. समाज संस्कृती निर्माण करतो आणि समाजच राष्ट्र निर्माण करतो. त्यामुळे संस्कृती आणि समाजाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने जी भावना निर्माण होते ती राष्ट्रभावना असते.

            यावर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. घरोघरी तिरंगा फडकावून नागरिकांनी या उत्सवात सहभाग नोंदवला. भारत आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय आणि पुढील येणारा काळ हा अमृतकाल आहे.  भारताचे निर्विवाद प्रभुत्व सिद्ध करण्याचा, आत्मभान जागवण्याचा आणि स्वत्व जपण्याचा काळ आहे. म्हणून या पर्वाचे महत्त्व आहे. भारत आज ज्या ठिकाणी आहे. त्यामागे आपल्या पुर्वसुरींचा विचार, त्याग, कष्ट आणि ध्येयाप्रती निष्ठा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे मूळ वा त्यामागे असलेली प्रेरणा ध्यानात घ्यायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज हे या स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान आहे. 

            स्वधर्म, स्वराज्य आणि स्वदेशी ही त्रिसूत्री भारतीय स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय आंदोलनाची प्रेरणा होती. एका अर्थाने, हा स्वत्वभाव जपण्याचा संघर्ष होता. या भावनेने संपूर्ण देश भारावलेला होता. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, शिवराम हरी राजगुरू, चाफेकर बंधू, उमाजी नाईक अशा महाराष्ट्रातल्या असंख्य क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांच्यासारख्या समाजसुधारकांनी रचनात्मक कामातून महिला शिक्षण आणि उपेक्षित समाजास सशक्तपणे परिवर्तित करणाऱ्या मोहिमा हाती घेतल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकसंध समाजनिर्मितीसाठी अथक प्रयत्न केले. सामाजिक समतेची मशाल हाती घेवून त्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी दिलेल्या संविधानाने नागरिकांना जगण्याची दिशा दिली, अधिकार दिले. त्यांचे कार्य या अमृतमहोत्सवी वर्षात संस्मरणीय असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

            यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.