अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेटचे सिनेटर जॉन ऑसोफ यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई, दि. 1 : युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेटचे (सिनेटर) वरिष्ठ प्रतिनिधीगृहाचे सदस्य  जॉन ऑसोफ  (Mr. Jon Osoff), वाणिज्य दूत माईक हॅन्की (Mr. Mike Hankey) यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी उभय देशांतील औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संबंध वृद्धिंगत करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी युएसएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत राज्याशी संबधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यात वैद्यकीय शिक्षणासाठी जॉर्जीया येथे भारतातील सर्वाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या गणेश उत्सवानिमित्ताने राज्यात असलेल्या उत्साहाच्या वातावरणात होत असलेल्या स्वागताने आपण भारावून गेल्याचेही यु. एस. ए. च्या प्रतिनिधींनी सांगितले. राज्यातील औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय परिस्थिती या सर्व बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान महत्त्वपूर्ण बाबींचा उल्लेख केला. ते म्हणाले, मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे. देशाच्या आर्थिक राजधानीबरोबरच सांस्कृतिक राजधानी म्हणूनही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्र हे उत्पादन, तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रात अग्रगण्य आहे. भारतात येत असलेली अमेरिकन गुंतवणूक ही राज्यात मोठ्या प्रमाणात येत आहे. राज्यातील ऊर्जा क्षेत्र, कृषी तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अमेरिकन उद्योजकांना उपमुख्यमंत्र्यांनी आमंत्रित केले.

शैक्षणिक क्षेत्राविषयी

नव्या शैक्षणिक धोरणानुसार संशोधन आणि कौशल्य विकास यावर भर देण्यात येत आहे. राज्यात असलेल्या अनेक शैक्षणिक संस्था आणि त्यातून तयार होत असलेले कुशल मनुष्यबळ यासाठी संधी निर्माण होणे आवश्यक आहे. सॉफ्टवेअर निर्मिती आणि निर्यातीमध्येही राज्य आघाडीवर आहे. तंत्रज्ञान संशोधन या क्षेत्रात काम करण्यासाठी इतर देशांचे सहकार्य घेण्यात येत आहे. नुकताच कॉर्नेल विद्यापीठासोबत यासंदर्भात करार झाला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कृषी क्षेत्राविषयी

राज्यासमोरील आव्हाने आणि संधी या विषयावर चर्चेदरम्यान बोलतांना श्री. फडणवीस म्हणाले, वातावरणीय बदल हे देशासमोरील मोठे आव्हान आहे. अवेळी येणाऱ्या पावसामुळे कृषी क्षेत्राला संकटाचा सामना करावा लागतो तर देशांतील कुशल मनुष्यबळ हे बलस्थान आहे.

कृषी आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर कृषी क्षेत्रासाठी केला जाणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योगावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. फलोत्पादन क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढविणार आहे. अणुऊर्जा निर्मितीबरोबरच सौर ऊर्जेचा वापर वाढविणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यावेळी उपस्थित होते.

***

विसंअ/अर्चना शंभरकर/ उपमुख्यमंत्री- शिष्टमंडळ