वारसा, संस्कार व ज्ञानातून देशाला सर्वोत्तम सेवा देणार – सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत

नागपुरातील देशपांडे सभागृहामध्ये भावनिक सत्कार सोहळा

नागपूर, दि.3 : माझ्या दोन पिढ्या माझ्या पूर्वी न्यायदानाच्या प्रक्रियेत होत्या. त्यामुळे मला वारसा, संस्काराने व ज्ञानाने जे काही सर्वोत्तम मिळाले आहे. ते देशाच्या न्याय प्रक्रियेची सेवा करताना अर्पण करणार असल्याचे विनम्र प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत यांनी आज येथे केले. नागपूर येथील देशपांडे सभागृहात सत्कार समारंभात ते बोलत होते.

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत यांचा आज ‘हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर’ मार्फत भावपूर्ण सत्कार डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आला. नागपूरसह, महाराष्ट्र व देशभरातील विधी व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.

सायंकाळी झालेल्या या सत्कार सोहळ्याला मुख्य अतिथी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, सरन्यायधिशांच्या सुविद्य पत्नी अमिता लळीत, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्तो, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती प्रसन्ना वऱ्हाडे, न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, हायकोर्ट बार असोसिएशन, नागपूरचे अध्यक्ष अॅड. अतुल पांडे, सचिव अॅड. अमोल जलतारे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी नुकतीच शपथ घेतली आहे. सरन्यायाधीश लळीत यांचे वडील न्यायमूर्ती  उमेश लळीत 1973 ते 1976 या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अतिरिक्त न्यायमूर्ती होते. सिव्हिल लाईन्स परिसरातील शासकीय निवासस्थानात त्यावेळी त्यांचा परिवार राहत होता. सरन्यायाधीश लळीत यांचे या काळात नागपूरमध्ये शिक्षण झाले. नंतर ते मुंबईत स्थानांतरित झाले होते. त्यामुळे आजच्या सत्कार समारंभाला नागपूर संदर्भातील आत्मियतेची किनार होती.

आपल्या सत्काराला उत्तर देताना त्यांनी देशपांडे हॉल आणि नागपूर या ठिकाणी असणाऱ्या ऋणानुबंधाचे अनेक दाखले दिले. ते म्हणाले, कायद्यासोबतचा आपला खरा प्रवास नागपूर येथून सुरू झाला. आपल्या वडिलांना न्यायधीश म्हणून बघताना आणि न्यायदान करताना नागपूर येथे प्रथम पाहिले आणि त्यानंतर या क्षेत्रातच आपले आयुष्य पुढे वाटचाल करीत राहिले. सभागृहात आज उपस्थित असणाऱ्या अनेक न्यायाधीशांपुढे आपण सुनावणीसाठी उभे राहिलो आहे. अनेक सहकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये सोबतीने लढलो आहे. त्या सर्वांना या ठिकाणी पाहून आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुष्यात माणसं वाचली पाहिजे. प्रत्येक माणूस एक पुस्तक असतो आणि हे पुस्तक आपण कशाप्रकारे वाचन करतो यावर आयुष्याचे धडे अवलंबून असतात. मी फार नशीबवान आहे कारण माझ्या कुटुंबाला कायद्याचा वारसा आहे. आजोबा, वडील अशा माझ्या दोन पिढ्या यापूर्वी न्यायदानाचे काम करीत होते. मात्र, तुम्हाला वारस्याने काय मिळाले. यापेक्षा तुम्ही तुमचे स्थान सक्षमपणे कसे निर्माण करता याला महत्त्व आहे. न्यायव्यवस्थेतील देशाचे हे सर्वोच्च पद सांभाळताना आपल्याला मिळालेला वारसा, संस्कार, ज्ञानातून देशाला सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी, नागपूर हायकोर्ट बार असोसिएशन तर्फे मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार न्यायाधीश भूषण गवई यांनी केला. यावेळी नागपूरचे सुपुत्र भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या शुभेच्छा संदेशाचे देखील वाचन करण्यात आले. विविध संघटनांनी त्यांचे यावेळी स्वागत केले.

या कार्यक्रमाला न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी हसऱ्या चेहऱ्यांनी कायम आपले मुद्दे मांडणारे न्यायमूर्ती उदय लळीत यांना देशाच्या विधी क्षेत्रातील सर्वोच्च पदावर विराजमान होत असताना बघणे आनंददायी असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती दिपांकर दत्तो यांनी जवळपास सर्व राज्यांमध्ये न्यायदानाचे व न्याय प्रक्रियेत काम करण्याची संधी लळीत यांना मिळाली असून त्यांच्यातील साधेपणा इतरांपेक्षा त्यांना वेगळा ठरवतो असे सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात न्यायमूर्ती भूषण गवळी यांनी नागपूरबद्दल सरन्यायाधीशांचे भावनिक नाते आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी दिलेला होकार यासाठी त्यांचे आभार मानले. प्रलंबित प्रकरणे देशासमोर सर्वात मोठी समस्या असून कायम प्रक्रियेबाहेर विचार करण्याची क्षमता ठेवणारे न्यायमूर्ती लळीत या समस्येवरही आपल्या कार्यकाळात वेगळा उपाय शोधतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे तर आभार सचिव अमोल जलतारे यांनी केले.

*****