राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कार्यावर आधारित पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 5 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या राज्यपाल पदग्रहणास 3 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दरबार हॉल, राजभवन मुंबई येथे राज्यपालांच्या कार्यावर आधारित तीन पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, नागालॅंडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य, लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, प्रधान सचिव संतोषकुमार यासह सर्व संबंधित मान्यवर  उपस्थित  होते. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ‘त्रैवार्षिक अहवाल : भगत सिंह कोश्यारी’  या कॉफी टेबल पुस्तकाचे तसेच ‘लोकनेता भगत सिंह कोश्यारी’ या रविकुमार आराक लिखित चरित्रात्मक मराठी पुस्तकाचे आणि ‘राज्यपाल के रूप में श्री भगत सिंह कोश्यारी के चुनिंदा भाषण’ या डॉ. मेधा किरीट यांनी संकलन / संपादन केलेल्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी पद्मनाभ आचार्य म्हणाले, लोकशाहीमध्ये राज्यपालाकडून अपेक्षित असलेली जबाबदारी श्री.कोश्यारी हे यशस्वीपणे पार पाडत आहेत. विद्यापीठ कुलपती म्हणून देखील ते उत्तम पद्धतीने कार्य करीत असल्याचेही ते म्हणाले.

राम नाईक म्हणाले, श्री. कोश्यारी यांच्या कार्यावर आधारित तिन्ही पुस्तके नव्या पिढीला राज्यपाल आणि त्यांची कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्याच्या दृष्टीने सहायक ठरतील. त्यासोबतच श्री. कोश्यारी यांनी गेल्या तीन वर्षांत राज्यपाल पदावरून घेतलेल्या विविध निर्णयांची, त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या महत्त्वाच्या कामांची माहिती देखील या तीन पुस्तकांद्वारे वाचकांना मिळेल, असे सांगितले.

यावेळी  राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, संतांच्या शिकवणुकीचा, शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, सुधारकांच्या प्रबोधनाचा समृद्ध वारसा असलेल्या महाराष्ट्रात राज्यपाल पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्या माध्यमातून अधिकाधिक लोकाभिमुखपणे जनतेसाठी काम करण्याच्या दृष्टीने गेली तीन वर्षे काम करत आहे. कोरोना संकटाला आपण सर्वांनी एकत्रितपणे ज्या पद्धतीने हाताळले त्याच पद्धतीने आपण सर्वांनी मिळून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, तळागाळातील जनसामान्यांपर्यंत चांगले जीवन जगण्याची संधी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला तर निश्चितच खूप चांगला बदल आपण घडवू शकतो. यादृष्टीने सर्वांनी अधिक चांगला भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विजय दर्डा म्हणाले, एक कृतीशील राज्यपाल म्हणून श्री. कोश्यारी यांची कारकीर्द स्मरणीय राहील. जनसामान्यांना भेटणारे तसेच राजभवनची कार्यपद्धती लोकाभिमुख करण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

प्रास्ताविकात संतोष कुमार यांनी सांगितले की, राजभवन लोकाभिमुख करण्यासाठी राज्यपाल आग्रही असल्याचे सांगून शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील विविध कामांसह राज्यातील सर्व जिल्ह्यात श्री. कोश्यारी यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांच्या कामाचे दस्तऐवजीकरण व्हावे, या उद्देशाने राजभवनने त्रैवार्षिक अहवाल पुस्तकाची निर्मिती केली आहे.

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर  उपस्थित होते.

००००