डॉ.आंबेडकर आणि मातंग परिषदांचा दस्तऐवज सामाजिक समतेच्या चळवळीचा दीपस्तंभ! – धम्मज्योति गजभिये

मुंबई / पुणे, दि. 12 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मातंग परिषदांचा ऐतिहासिक दस्तऐवज सामाजिक समतेच्या चळवळीसाठी दीपस्तंभ ठरेल, असे प्रतिपादन बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या 13 मातंग परिषदांच्या संशोधन व संकलनाच्या अनुषंगाने महासंचालक धम्मज्योति गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीची पहिली बैठक दि.7 सप्टेंबर रोजी बार्टीच्या मुख्यालयात झाली. या बैठकीला निबंधक तथा विभाग प्रमुख इंदिरा अस्वार, विभागप्रमुख तथा जात पडताळणी अध्यक्ष डॉ.ज्योत्स्ना पडियार, उपायुक्त तथा विभागप्रमुख उमेश सोनवणे, विभागप्रमुख विस्तार व सेवा डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण, कार्यालय अधिक्षक डॉ. संध्या नारखेडे, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक विकास गायकवाड, प्रकल्प अधिकारी रजनी वाघ  उपस्थित होते.

श्री. गजभिये म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयोजित केलेल्या विविध समाजाच्या परिषदांविषयी पाहिजे तसे संशोधन न झाल्यामुळे बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची माहिती त्या त्या समाजापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे खरा इतिहास समोर आला नाही. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातील असंख्य कार्यकर्त्यांनी आंबेडकरी चळवळीत समर्पित भावनेने कार्य केले. अनेकांनी बलिदान देखील दिले, या सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नातून आंबेडकरी चळवळ गतिमान व सर्वव्यापी झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाच्या उत्थानासाठी ज्या परिषदा आयोजित केल्या त्याचे संशोधन करून दस्तऐवजीकरण झाल्यास येणाऱ्या पिढ्यांसाठी हा अनमोल ठेवा असेल.

मातंग परिषदांच्या अभ्यासासाठी समिती गठित

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या 13 मातंग परिषदा शोधून काढणे, त्यांचे संशोधन, संकलन करून ग्रंथरूपाने प्रकाशित व्हावे यासाठी बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या सूचनेवरून निबंधक तथा संशोधन विभागप्रमुख इंदिरा अस्वार यांनी महाराष्ट्रातील तज्ज्ञ अभ्यासकांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि 13 मातंग परिषद अभ्यास समिती गठित केली. या समितीचे निमंत्रित सदस्य म्हणून प्रसिद्ध विचारवंत रमेश राक्षे (पुणे), इतिहास संशोधक डॉ.संभाजी बिरांजे (कोल्हापूर), समाजशास्त्र अभ्यासक प्रा.डॉ.सुरेश वाघमारे (लातूर) आणि साहित्यिक प्रा.डॉ.विजयकुमार कुमठेकर (जालना) हे असून या समितीचे सदस्य सचिव डॉ.प्रेम हनवते (संशोधन अधिकारी बार्टी) हे आहेत.

००००