अडचणीतील सूतगिरण्या आणि यंत्रमाग पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासाठी शासन सहकार्य करणार – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

0
10

मुंबई, दि. 14 : कृषी क्षेत्रानंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मितीचे क्षेत्र म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिले जाते. परंतु राज्यातील अनेक सूतगिरण्या आणि यंत्रमाग अडचणीत आहेत. ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी  शासन सहकार्य करेल, असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आज मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, वस्त्रोद्योग आयुक्त शितल उगले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, राज्यातील सूतगिरण्या अनेक वर्षांपासून अडचणीत आहेत. काही बंद आहेत  तर काही बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. या सर्व सूतगिरण्यांबाबत त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत. यावर काय उपाययोजना करता येतील याबाबत प्रत्येक सूतगिरणी नुसार विभागाने सविस्तर प्रस्ताव तयार करावा. या सूतगिरण्या सुरू राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे श्री. पाटील यांनी सांगून टेक्सटाईल पार्क संदर्भात आढावा घेतला. काही टेक्सटाईल पार्कला भेट देऊन पाहणी करण्यात येईल त्यांच्या अडचणी समजून घेण्यात येतील, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/14.9.22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here