प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत प्रमाणपत्रे सादर करण्यास मुभा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 15 : शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता विविध अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांना लागणारी विविध प्रमाणपत्रे प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.

केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशित होताना विविध प्रमाणपत्रे सादर करावी लागतात. त्यामध्ये EWS/NCL/CVC/TVC या प्रमाणपत्रांचाही समावेश असतो. विद्यार्थ्यांना असे प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करुन घेताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे तत्काळ जात वैधता प्रमाणपत्र मिळवून विहित वेळेत केंद्रीय प्रवेश नियामक प्राधिकरणास सादर करणे विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत मूळ प्रमाणपत्रे केंद्रीय प्रवेश नियामक प्राधिकरणास सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

००००