मराठवाडा मुक्तिसंग्राम चित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

0
9

औरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांची माहिती नागरिकांना व्हावी, या उद्देशाने प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी झाले. मुक्तिसंग्रामाच्या देदीप्यमान इतिहासाचे अत्यंत प्रभावी दर्शन या प्रदर्शनातून होत असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या सहकार्याने आयोजित हे चार दिवसीय चित्र प्रदर्शन सिद्धार्थ उद्यान परिसरात भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय वित्त मंत्री डॉ. भागवत कराड, सर्वश्री आमदार संजय शिरसाट, अभिमन्यू पवार, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, जीएसटी विभागाचे आयुक्त जी. श्रीकांत, सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागूल, आदी उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांचे माहिती संचालक हेमराज बागुल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रदर्शनाचे आयोजन  जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. या प्रदर्शनास नागरिक, विद्यार्थी, अभ्यासकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. हे प्रदर्शन निशुल्क असून मंगळवार, 20 सप्टेंबरपर्यंत सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत खुले राहणार आहे. प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here