अंगणवाड्यांचा विकास लोकसहभागातून करा – मंत्री मंगलप्रभात लोढा

औरंगाबाद, दि.17, (जिमाका) :- अंगणवाड्याचा विकास लोकसहभागातून होण्याच्या दृष्टीने अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी  व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) आाणि विविध सामाजिक संस्थानी प्राधान्याने पुढे येत लोकसहभागातून अंगणवाड्याचा विकास साधावा, असे आवाहन पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले.

रेल्वे स्थानक परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयात महिला व बालविकास या विषयावर आढावा बैठकीत श्री. लोढा बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, सहायक आयुक्त (विकास) विना सुपेकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा महिला बालविकास अधिकार प्रमोद इंगोले, बाल विकास प्रकल्प अधिकारी संजय कदम, गणेश पुंगळे आदिसह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून अंगणवाडीतील आरोग्य तपासणी, पायाभूत सुविधा खाद्यपुरवठा आदिसाठी सामाजिक संस्था,सीएसआर निधीच्या माध्यमातून तसेच लोकसहभागातून अंगणवाडीच्या पायाभूत सुविधेकरीता शहरातील किमान 25 टक्के अंगणवाड्या व ग्रामीण भागातील किमान 30 टक्के अंगणवाड्याच्या पायाभूत सुविधेकरीता सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन श्री. लोढा यांनी केले. अंगणवाडी पदभरती, इमारत दुरूस्ती बालसुधारगृह, बालगृह, समुपदेशन केंद्र, केंद्राद्वारे राबविण्यात येणारी मिशन शक्ती योजना,उज्ज्वला योजना पोषण महासप्ताह, महिला आर्थिक विकास महामंडळे, शासकीय मुलांचे अनुरक्षण गृह केंद्र, निरीक्षण गृह आदिच्या सोईसुविधेचा आढावा घेत बचतगटाच्या माध्यमातून उत्पादनवाढीसाठी प्रस्ताव तत्काळ पाठवण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना श्री लोढा यांनी यावेळी दिल्या.

*****