दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून भावी पिढी सक्षम बनविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 21 : राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना रोजगार व शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यापूर्वी एचसीएल कंपनीसोबत करार झालेल्या ‘मिलाप’ या कार्यक्रमाअंतर्गत 25 हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने या दोन करारांद्वारे 40 हजार विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात झालेल्या या करार हस्तांतरण कार्यक्रमास शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, सहसचिव इम्तियाज काझी, टाटा इन्स्टिट्यूटच्या वतीने स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनच्या प्रमुख प्राचार्य मधुश्री शेखर, तानिया शॉ, विनीता कौशल आदी उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील उद्दिष्टांनुसार 2025 पर्यंत 50 टक्के शाळांपर्यंत व्यावसायिक शिक्षण पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. याअंतर्गत हा करार करण्यात आला आहे.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, भविष्यातील पिढी सक्षम बनविण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम महाराष्ट्र घडविण्यात येणार असून पर्यायाने सक्षम भारत घडविण्याकडे वाटचाल करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचे विविध प्रश्न देखील लवकरात लवकर सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व विषयांची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढावी, लहान विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये, त्यांना पुरेशी झोप मिळावी यादृष्टीने शिक्षण पद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने तज्ज्ञांची मदत घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आहार पौष्टिक असावा यावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सामंजस्य कराराबाबत माहिती देताना श्री.केसरकर म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास घडवून आणण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कोणतेही काम करताना उत्कृष्टता यावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. यादृष्टीने त्यांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने आज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या नामांकित संस्थेद्वारे पदविका व पदवी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याअंतर्गत कमवा व शिका या तत्त्वावर कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी बारावीनंतर प्रवेश घेऊ शकणार आहेत. या संस्थेने अभ्यासक्रमाकरीता ताज ग्रुप, एलआयसी, टायटन, टीसीएस, मारूती सुझुकी, फोर्टिस, स्टार हेल्थ इन्शुरन्स, लेन्सकार्ट, ल्युपिन अशा विविध 3750 उद्योग कंपन्यांसोबत करार केला असून विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याची सोय उपलब्ध असणार आहे. यात प्रामुख्याने पारंपरिक अभ्यासक्रमासोबत टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी, माहिती तंत्रज्ञान, मीडिया व एंटरटेनमेंट, बँकींग व वित्तीय क्षेत्रातील संधीचा समावेश आहे. यासाठी राज्यात एकाच वेळी विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्याच्या समग्र शिक्षा कार्यालयाने यापूर्वी सुरू केलेल्या ‘मिलाप’ या कार्यक्रमाद्वारे माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एचसीएल कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यात आतापर्यंत 34 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याद्वारे 25 हजार तरूणांना रोजगार उपलब्ध होईल तर, आज झालेल्या कराराद्वारे सुमारे 15 हजार तरूणांना रोजगार व शिक्षणाची संधी उपलब्ध होईल, अशी माहिती श्री.केसरकर यांनी यावेळी दिली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/21.9.22