शुद्ध कोळशामुळे प्रदूषण कमी होईल – खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

नागपूर,दि. 20: कोल वॉशरिजमुळे विद्युत प्रकल्पांना शुद्ध व स्वच्छ कोळसा मिळतो. त्यामुळे प्रदूषण कमी होईल. त्यासोबतच शुद्ध कोळसा मिळाल्यामुळे वीज  निर्मितीमध्ये बचत होणार असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

कन्हान जवळील गोंडेगाव कोल वॉशरिजला भेट देऊन पाहणी करताना ते बोलत होते. आमदार आशिष जायसवाल, मॅगनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम.जे. प्रदीप चंद्रन, रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार श्री. सांगोळे, कोल वॉशरिजचे वरिष्ठ महाप्रबंधक वासुदेव गुरवे, देवशर्मा, संचालक अमित अग्रवाल, महाप्रबंधक प्रशांत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

गोंडेगाव येथील कोळसा कोल वॉशरिज मध्ये आणून त्याला शुद्ध व स्वच्छ केले जाते. त्यामधील कार्बन मोनॉक्साईड व नायट्रोजन वेगळे केले जात असल्यामुळे हा कोळसा पर्यावरणपूरक आहे, अशी माहिती देव शर्मा यांनी दिली. त्यासोबतच अपुरा साठा असल्यास उमरेड कोळसा खाणीतून  कोळसा मागवून त्यास शुद्ध करुन तो महाजेनको कोराडी व खापरखेड्याला पुरविला जातो. येथील कोळसा शासकीय दरापेक्षा कमी दराने मिळतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

खनिकर्म मंत्री भुसे यांनी कोल वॉशरिजची पाहणी करुन तेथील प्रक्रियेबाबत माहिती घेतली. यावेळी कोल वॉशरिजच्या प्रकल्पाविषयी नकाशाची पाहणी केली.