माथाडी कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन प्रयत्नशील – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

मुंबई, दि. २१ : माथाडी कामगारांना सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी शासन योग्य ती पाऊले उचलत असल्याची ग्वाही कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी कामगार संघटनाच्या प्रतिनिधींना दिली.

माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे, माजी आमदार नरेंद्र पाटील, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, उपसचिव दादासाहेब खताळ,  माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. खाडे म्हणाले, विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच ही नियुक्ती कायमस्वरुपी करावयाची असल्यास बिंदू नामावली, आकृतीबंध तपासून ती करण्यात येईल. मालिका, नाटक, चित्रपट कामगारांकरिता स्थापन झालेल्या माथाडी बोर्डाच्या धर्तीवरच रंगकर्मी बोर्डाची स्थापना करण्यासाठी तसेच या कामगारांना संरक्षण देण्यासाठी हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कामगारांच्या फायद्यासाठी शासनाची यंत्रणा कार्यरत आहे. कामगार कायद्यानुसार प्रत्येक कामगारांना त्यांच्या न्याय हक्काप्रमाणे अनुदान, संरक्षण मिळाले पाहिजे. कामगार जगला पाहिजे तसेच कंपनीही चालली पाहिजे. माथाडी कामगार कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीकरिता लवकरच कायद्यात बदल करण्यात येतील. कामगारांच्या प्रत्येक समस्या निवारणासाठी आम्ही सुरूवात केली असून त्यांच्याकरिता कार्यपद्धतीही (SOP) लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही मंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी सांगितले.

माथाडी कामगारांच्या हजेरीसंदर्भात पारदर्शकता आणण्यासाठी कंपनीने कार्यस्थळी सीसीटीव्ही लावावेत. त्याचप्रमाणे प्रत्येक नोंदणीकृत कामगारांना बायोमेट्रिक उपस्थितीची व्यवस्था करावी, जेणेकरून कामगारांना पगार देणे सोईस्कर होईल. माथाडी कामगारांचे नियम राज्यातील सर्व कंपन्यांना लागू असून ते सर्वांनी पाळावेत. कंपन्यानी माथाडी कामगारांची मागणी करावी. आवश्यकतेनुसार सर्व कंपन्याना माथाडी कामगार पुरविले जातील, असेही मंत्री डॉ.खाडे यांनी सांगितले.

0000