पुणे, दि.२२: जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या माध्यमातून होणारी मद्यविक्री संपूर्णपणे बंद करण्यासाठी मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त अनिल चासकर, अधीक्षक चरणसिंह राजपूत, उपअधीक्षक संजय पाटील, युवराज शिंदे आदी उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या माध्यातून होणारी मद्यविक्री बंद करुन संबंधितावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करा. कार्यवाही करतांना पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. परराज्यातून होणारी अवैध मद्यवाहतूक रोखण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. पोलीस विभागाप्रमाणे अवैध दारू व्यवसायाला प्रतिबंध घालण्यासाठी खबऱ्यांची मदत घेण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अधीक्षक श्री.राजपूत यांनी बैठकीत विभागाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीत दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.