प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयामार्फत संस्कारी पिढ्या निर्माण करण्याचे कार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि.22 : माणसाच्या शरीराची स्वच्छता आंघोळीने होईल. मात्र, मनाची स्वच्छता, शुद्धता करण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारीमार्फत देशभर कार्य सुरू आहे. या ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या राजयोगी शिक्षिका -शिक्षक देशभर संस्कारी पिढ्या निर्माण करण्याचे कार्य करतात. याचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात या संस्थेच्या कार्याचे महत्व विशद केले.

विदर्भात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कार्याला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला नागपूर येथील लक्ष्मीनगर, नंतर धरमपेठ त्यानंतर वसंत नगर तर आता जामठा परिसरात ‘विश्वशांती सरोवर’ हे मोठे केंद्र या ठिकाणी निर्माण झाले आहे. नागपूर येथील ब्रह्मकुमारींच्या सुवर्ण महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित होते.

व्यासपीठावर राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यासह राजयोगिनी संतोष दीदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मोहन मते, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, अजय संचेती, नागपूर येथील ब्रह्मकुमारी वरिष्ठ राजयोगी शिक्षिका रजनी दीदी, उपमुख्यमंत्री यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, किरीट भंसाली, केंद्राचे वरिष्ठ साधक उपस्थित होते.

भारताचे हृदयस्थान असणाऱ्या नागपूर शहरांमध्ये गेल्या 50 वर्षात प्रजापिता ब्रह्मकुमारीमार्फत संस्कारी पिढ्या निर्माण करण्याचे कार्य आमच्या भगिनीमार्फत सुरू आहे. आज जमलेल्या गर्दी आहे. या गर्दीमध्ये भव्यता नाही, शुद्धता आहे, साधेपणा आहे, आमच्या मनाची स्वच्छता तुम्ही ठेवता. याचा आम्हाला आनंद आहे, असे फडणवीस म्हणाले.

जगातल्या सर्व ठिकाणी शांती नांदावी, यासाठी या ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या भगिनी जगभर काम करतात. शांतीकडे जाणारा मार्ग निश्चित करण्याचे काम ब्रह्मकुमारी करत आहे. जगातला अंधकार दूर करणे गरजेचे आहे अज्ञानाच्या अंधारात असल्यामुळे संघर्ष आहे. हा संघर्ष कमी करून शांती निर्माण करण्याचे पवित्र काम आपण करीत असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

जगभरातील देशभरातील संशोधन व उत्खननातून अनेक पुरावे पुढे आले आहेत .जगातली सर्वात प्राचीन सभ्यता भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे भारत जगाला विचार देऊ शकतो. जगाला देखील भारताकडून हीच अपेक्षा आहे. त्यामुळे देशाला, जगाला शांतता बहाल करण्याचे काम ब्रह्मकुमारीमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे, या कार्यासाठी आमच्या शुभेच्छा असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनीही यावेळी संबोधित केले. ते म्हणाले ब्रह्मकुमारी यांचे विचार अतिशय शुद्ध असून जगामध्ये शांती प्रस्थापित करणे हे त्यांचे काम आहे त्यांच्या कामामुळे भारताला विश्वगुरू बनविण्याचे स्वप्न आम्ही सर्वांनी बघितले आहे ते निश्चित पूर्ण होईल.

साधे व स्वच्छ विचाराचे जगणे भ्रष्टाचार देखील दूर करू शकते. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रत्येक नागरिकांने साधेपणाची व शुद्ध आचाराची जीवनपद्धती अवलंबल्यास विश्वगुरू होण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी खासदार विजय दर्डा, अजय संचेती यांनीही संबोधित केले. विदर्भात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कार्याला 50 वर्षे झाले आहेत. वरिष्ठ राजयोगी शिक्षिका रजनीदीदी यांच्या मार्गदर्शनात नागपूर, विदर्भातील प्रमुख शहरातील हजारो राजयोगी शिक्षिका व शिक्षक सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी जामठा येथील विश्वशांती सरोवर येथे एकत्रित आले होते.

*******