समृद्धी महामार्गाप्रमाणे ‘नागपूर -गोवा एक्सप्रेस मार्ग’ होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
6

नागपूर दि.२४ : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर गोवा एक्सप्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ-मराठवाडा -पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिकल कॉरिडॉर ‘विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ ( नरेडको ) या संस्थेमार्फत नागपूर येथील ली -मेरिडियन हॉटेल येथे बांधकाम व्यावसायिक आणि विकासक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा विविध गटातील उपलब्धीसाठी पुरस्कार सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने आ.परिणय फुके, आ. मोहन मते, माजी खासदार विजय दर्डा, उपमुख्यमंत्री यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, नरेडकोचे अध्यक्ष राजन बांदेळकर, उपाध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, माजी खासदार विजय दर्डा,महा रेराचे संस्थापकीय प्रमुख गौतम चॅटर्जी, विदर्भ नरेडकोचे अध्यक्ष घनश्याम ढोकणे, उपाध्यक्ष ब्रिजमोहन तिवारी उपस्थित होते.

नागपूर हे शहर ‘लॉजिस्टिक हब ‘ म्हणून पुढे येणार आहे. नागपूर वर्धा या ठिकाणी पुढील काळात मोठ्या प्रमाणात ‘लॉजिस्टिक सपोर्ट ‘ तयार होणार आहे. भारतातील प्रत्येक मोठ्या शहराला आठ ते दहा तासात नागपूर जोडले जाणार आहे. त्यामुळे या शहरात बांधकाम व्यावसायिक व विकासक यांना फार मोठी संधी आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये ५ हजार किलोमीटरचे ‘एक्सप्रेस ‘महामार्ग तयार करण्याचे सूतोवाच केले आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील सर्वात मोठा ‘इकॉनोमिकल कॉरिडॉर’, म्हणून विकसित होणार आहे.यापाठोपाठ विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ते गोवा हा नवा ‘इकॉनोमिकल कॉरिडॉर ‘तयार होत आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर दिल्ली आणि नागपूर हैदराबाद महामार्ग विकसित होणार आहे. त्यामुळे विदर्भात लवकरच नवे नागपूर, नवे वर्धा, नवे अमरावती अशी विस्तारित शहरे आकारास येणार आहेत.

हरितपट्ट्यांचा बचाव करत नवीन शहरे वसवली पाहिजे. याकडे बांधकाम व्यावसायिक व विकासकांनी लक्ष वेधावे, असे आवाहन त्यांनी केले.या ठिकाणी उपस्थित महारेराचे संस्थापकीय प्रमुख गौतम चॅटर्जी यांची उपस्थिती अधोरेखित करीत त्यांनी मुख्यमंत्री असताना रेरा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराची माहिती दिली. महा-रेरा सारख्या कायद्यामुळे बांधकाम व्यावसायिक व विकासक यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला. विश्वासार्हता वाढली. रेरामुळे बांधकाम विकासक क्षेत्रात महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत अग्रेसर राज्य झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीदेखील या क्षेत्रात महाराष्ट्राने घेतलेल्या भरारीचे कौतुक केले आहे. या कायद्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरे झपाट्याने विकसित होत आहे, नव्या सरकारमध्ये बांधकाम व्यावसायिक व विकासकांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील. कोणतीही फाईल थांबणार नाही. तातडीने निर्णय घेतले जातील असेदेखील त्यांनी सांगितले.

तथापि,सामान्य नागरिकांना परवडणारी घरे आणि हरित पट्टे सांभाळत तयार होणारी विस्तारित शहरे बनविण्याकडे लक्ष द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यास सभापती मनोज कुमार सूर्यवंशी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन महानगरपालिका प्रशासन व नरेडकोच्या समस्या असतील तर बैठकीतून सोडवा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मान्यवरांना विविध गटात यावेळी पुरस्कार वितरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here