व्यापार व उद्योगवृद्धीसाठी शासनाचे सर्वताेपरी सहकार्य – उद्योगमंत्री उदय सामंत

0
10

पुणे दि.२५ : उद्योग व व्यापार वाढल्यानेच राज्यात रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार असल्याने व्यापार व उद्योगवृद्धीसाठी  शासनाचे सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे  दि पुना मर्चंटस चेंबर आयोजित आदर्श व्यापारी ‘उत्तम’  पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, दि पूना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, सहसचिव ईश्वर नहार, माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले, प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले,  दि  पूना मर्चंटस चेंबरच्या माध्यमातून चांगले काम केले जात आहे. कोरोना संसर्गाच्या काळात व्यापाऱ्यांनी चांगले काम केले.  लवकरच व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बैठक घेण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्यापारी व उद्योजकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल.

महाराष्ट्रात १० लॉजिस्टिक पार्क व ९ ड्रायपोर्टची निर्मिती करण्यात येणार असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात  मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत ७५ हजार रोजगार निर्मिती करण्याचे ठरविले आहे. तसेच या वर्षांत २५ हजार उद्योजक तयार करावयाचे आहेत. त्यासाठी व्यापारी व उद्योजकांनी सहकार्य करावे. महाराष्ट्राला  उद्योग क्षेत्रात पुढे आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. सामंत यांच्या हस्ते आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कार’ २०२२ प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला दि पूना मर्चंटस चेंबरचे  सर्व कार्यकारिणी सदस्य, उद्योजक, व्यापारी आदी उपस्थित होते.

                                 000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here