कोविडसह इतर संकटे कायमचे दूर होऊ दे! – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रार्थना

0
21
नांदेड (जिमाका) दि. 26 :- गत दोन वर्षे कोविड-19 मुळे अनेक धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या सुरक्षिततेच्यादृष्टिने काही निर्बंध आपल्याला पाळावे लागले. व्यापक लसीकरण आणि नियोजनातून कोविडवर आपल्याला मात करता आली. यावर्षी पासून सर्व धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाले असून कोविडसह जे काही आरोग्याची संकटे आहेत ती कायमची दूर व्हावीत अशी प्रार्थना मी श्री रेणुकादेवीच्या चरणी केल्याची भावना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली. माहूरगडावर श्री रेणुकादेवीची सपत्निक पुजा आज त्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह संस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्या हस्ते सपत्निक घटस्थापना
आज दिनांक 26 रोजी श्री रेणुकामातेची वैदिक महापुजा व घटस्थापना संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. यावेळी खासदार हेमंत पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे सचिव किर्तीकिरण एच. पुजार हेही सपत्निक पूजेत सहभागी झाले. याचबरोबर कुमारीकापुजन, सुहासिनीपुजन, प्रथेप्रमाणे गणेशपुजन, कलशपुजन, पुण्याहवाचण, मातृकापुजन करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा संस्थानचे उपाध्यक्ष विजय डोंगरे, तहसिलदार तथा संस्थानचे कोषाध्यक्ष किशोर यादव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, बालाजी जगत, दुर्गादास भोपी, अरविंद देव, अशिष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढील दहा दिवस प्रथेप्रमाणे पुजेसह विविध कार्यक्रमांचेही माहूरगडावर आयोजन करण्यात आलेले आहे. भक्तांना ऑनलाईन दर्शन व विविध कार्यक्रमाच्या वेळापत्रकाची माहिती संस्थानच्यावतीने करून देण्यात आली आहे. shrirenukadevi.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here