‘लोकराज्य’मधील विषय समाज परिवर्तनशील – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि.21 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकामधील विषय हे समाज परिवर्तनशील असल्याचे गौरवोद्गार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधानभवन परिसरात शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या दुर्मिळ अंकांचे प्रदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत लावण्यात आले आहे. या प्रदर्शनास त्यांनी भेट दिली,  त्यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी आमदार अभिजित वंजारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज, संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागूल, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ. राहुल तिडके, उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, नागपूरचे जिल्हा माहिती अधिकार प्रविण टाके, आदी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेले ‘लोकराज्य’ मासिक सामान्य लोकांपर्यंत पोहोचणारे एकमेव मासिक आहे. सात दशकांची समृद्ध परंपरा असलेल्या लोकराज्यची व्याप्ती वाढविण्यासाठी आवश्यक ती मदत करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ग्रामपंचायात स्तरावरील विकासावर आधारित लेख लोकराज्यमध्ये समाविष्ट करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

लोकराज्य टीम परिश्रम घेऊन विविध विशेषांकांची निर्मिती करत आहे. या प्रदर्शनात 1964 पासूनचे दुर्मिळ अंक ठेवण्यात आले आहेत. हिवाळी अधिवेशन कालावधीत विधानभवनात येणाऱ्या सर्व स्तरातील लोकांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी, असे हे प्रदर्शन असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लोकराज्य मासिकाच्या वाटचालीस तसेच महासंचालनालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

0000000

राजू धोत्रे/विसंअ