नागपूर, दि. 21 : हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी दिवसभर विविध कामांच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. अशात मोकळ्यावेळी त्यांना आराम मिळावा व त्यांच्यात मराठी सिनेमाची आवडही निर्माण व्हावी यासाठी प्रशासनाकडून प्रायोगिक स्तरावर मोबाईल डिजिटल मुव्ही थिएटरची उभारणी करण्यात आली आहे. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या मागे मोफत स्वरूपात विधानपरिषद व विधानसभा सदस्य तसेच अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी मराठी सिनेमा दररोज अधिवेशन कामकाज संपल्यानंतर रात्री 7.00 वा. पासून ते 10.00 वा. पर्यंत दाखविण्यात येणार आहे. याची सुरूवात दि.21 डिसेंबर रोजी मराठी चित्रपट पावनखिंड ने झाली. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी उपस्थित होत्या. मुव्ही थिएटर या फॉरमॅटमध्ये असलेला हा प्रयोग आपण सर्वांनी एकदा अनुभवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. मंत्री तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानमंडळ निवास व्यवस्था वाटप समितीच्या मंजुरीनुसार दि. 30 डिसेंबर पर्यंत मराठी सिनेमा दाखविण्यात येणार आहेत. एखाद्या मल्टीप्लेक्स सारख्या हुबेहुब सुविधा असलेल्या मिनी थिएटरमधे एकावेळी 120 लोक बसू शकतात.
मिनी थिएटर मधे दर्जेदार मराठी चित्रपटांची मेजवानी – दि.22 डिसेंबर रोजी हवाहवाई, 23 डिसेंबर रोजी सिंहासन, 24 डिसेंबर गोष्ट छोटी डोंगरा एवढी, 25 डिसेंबर हरिश्चंद्राची फॅक्टरी, 26 डिसेंबर दुनियादारी, 27 डिसेंबर जैत रे जैत, 28 डिसेंबर नटसम्राट, 29 डिसेंबर टाइमपास व 30 डिसेंबर रोजी सैराट / मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हे चित्रपट दाखविले जाणार आहेत.
000000