कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

विधानसभा निवेदन, इतर कामकाज

नागपूर, दि. २२ : जगातील चीनसह अन्य देशांत कोरोना विषाणूचा बीएफ 7 हा नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकाराचा महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळून आलेला  नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता म्हणून मास्कचा वापर करीत गर्दीत जाताना सुरक्षित अंतर ठेवावे, असे निवेदन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत केले.

मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या संसर्गाची तीव्रता ओमीक्रॉनपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. तसेच कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर चाचणी, पाठपुरावा, उपचार आणि लसीकरणावर भर देण्यात येईल. आरोग्य यंत्रणांनाही सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात आतापर्यंत 95 टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच येत्या सोमवारपासून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना नुसार आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची ताप चाचणी करण्यात येईल.

०००००

गोपाळ साळुंखे/स.सं.