प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत मोहीमेत लोकसहभाग वाढविणे गरजेचे- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि. २२ :  भारतातून सन 2025 पर्यंत क्षयरोगाचे दूरीकरण झाले पाहिजे. यासाठी निक्षय मित्रांची संख्या वाढली पाहिजे. क्षयरोगाचे दूरीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत मोहीमेत लोकांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

आज 22 डिसेंबर रोजी राजभवनातील सभागृहात श्री. कोश्यारी यांनी प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानाच्या अनुषंगाने नागपूर आणि अमरावती आरोग्य परिमंडळातील क्षयरोगाबाबतचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. सभेला सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, राज्यपालांचे प्रधान सचिव श्री. संतोषकुमार, उपसचिव श्वेता सिंगल, नागपूरचे मनपा अपर आयुक्त राम जोशी, नागपूर आरोग्य परिमंडळाच्या उपसंचालक डॉ. विनिता जैन, आरोग्य अभियान पुण्याच्या डॉ. सुनिता गोलहीत, डॉ. रामजी अडकेकर, डॉ. अशोक रणदिवे यांचेसह नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हा क्षयरोग अधिकारी तसेच सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

श्री. कोश्यारी म्हणाले, क्षयरुग्ण क्षयरोगमुक्त व्हावा यासाठी विविध प्रकारच्या तपासण्या व औषधोपचार करण्यात येतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांना क्षयरोगमुक्त अभियानात सहभागी करुन घ्यावे. आपल्या देशात परोपकाराची भावना असल्यामुळे निश्चितपणे लोकांचा सहभाग यामध्ये मिळेल. आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क करुन त्यांच्यासोबत सभा घेऊन स्वयंसेवी संस्था, उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींना सभेला बोलावून या मोहिमेत त्यांचा सहभाग घ्यावा, असे ते म्हणाले.

तालुका आणि जिल्हा पातळीवर निक्षय मित्र तयार करण्यास प्रोत्साहन द्यावे, असे सांगून श्री. कोश्यारी म्हणाले, कोणताही अधिकारी-कर्मचारी निक्षय मित्र होण्यास तयार असतील तर त्यांना यामध्ये सहभागी करुन घ्यावे. एका महिण्याच्या आत प्रत्येक रुग्णामागे एक निक्षय मित्र असला पाहिजे. क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळेत उपचार सुरु करावे. त्यामुळे हे रुग्ण उपचारातून त्वरीत बरे होतील. क्षयरोगमुक्तीसाठी येत्या काही दिवसात जास्तीत जास्त वेगाने आरोग्य विभागाने काम करुन ही मोहीम गांर्भीयाने घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

श्री. खंदारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून क्षयरोगमुक्त भारत अभियानात करण्यात येत असलेल्या उपाययोजना, पौष्टीक आहार, निक्षय मित्र योजना, क्षयरुग्णांसाठी उपचार पद्धती, तपासणीसाठी करण्यात येत असलेल्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची उपलब्धता आणि राज्यातील क्षयरुग्णांची माहिती दिली.

यावेळी क्षयरोगमुक्त भारत अभियानात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल पारसमल पगारिया फाऊंडेशन नागपूरचे जीवल पगारिया, डॉ. सुभाष राऊत व सहयोग फाऊंडेशनचे तारक धनवाणी यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सभेला उपस्थित विदर्भातील 11 जिल्ह्यातील सर्व जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी आपआपल्या जिल्ह्यातील प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानात करण्यात येत असलेल्या कामाची माहिती यावेळी दिली.