जमीन मालकांना भूसंपादनाचा मोबदला देण्याची कार्यवाही तात्काळ करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0
7

नागपूर, दि.२९ : धुळे येथील सर्व्हे क्रमांक ८०/५, ८०/६ व ८०/७/५ या आरक्षित जमिनीचे भूसंपादन व जमीन मालकांना मोबदला देण्याची कार्यवाही धुळे महानगरपालिकेने तात्काळ करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

धुळे येथील सर्व्हे क्रमांक ८०/५, ८०/६ व ८०/७/५ या जमिनीच्या भूसंपादनाबाबत आढावा बैठक विधानभवन येथे डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सह सचिव प्रतिभा भदाने, धुळे महानगरपालिका आयुक्त देविदास टेकाळे, शेतकरी घनश्याम खंडेलवाल व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

धुळे येथील सर्व्हे क्रमांक ८०/५, ८०/६ व ८०/७/५ ही जमीन २००३ ते २०२२ पर्यंत म्हाडाच्या विविध योजना राबविण्यासाठी संपादित केली होती. परंतु म्हाडाने हे भूसंपादन रद्द केले. दरम्यान महानगरपालिकेने या जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित केल्याने  महानगरपालिकेने या जमिनींचे भूसंपादन करून जमीन मालकांना मोबदला देण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

याबाबत जमीन मालकांनी लेखी निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी संबंधित बैठक आयोजित केली. तसेच या आरक्षित भूखंडाबाबत प्रशासकीय बाबी व तांत्रिक बाबींची पूर्तता जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here