मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सन 2022-23 च्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडा मंत्री गिरीष महाजन, विधानसभा विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत नागपूर विधानभवनात करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सन 2022-23 ची माहिती
राज्यात क्रीडा संस्कृतीचे जतन करणे व क्रीडा वातावरण निर्माण व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सन 2022-23 चे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडूंचा दर्जात्मक खेळ पाहण्याची संधी नागरिक व नवोदित खेळाडू यांना उपलब्ध व्हावी, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्याचा नावलौकीक व अधिक पदके प्राप्त व्हावीत, यासाठी राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे व स्पर्धेच्या संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहेत.
राज्यात 23 वर्षानंतर अशा स्पर्धांचे आयोजन होत आहे. राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. दिनांक 2 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत 9 जिल्ह्यात 39 क्रीडा प्रकारात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 3 हजार 857 पुरुष व 3 हजार 587 महिला खेळाडू असे एकूण 7 हजार 444 खेळाडू सहभागी होणार आहेत. क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच, स्वयंसेवक, तांत्रिक अधिकारी यांच्यासह एकूण 10 हजार 456 जणांचा सहभाग असणार आहे.
क्रीडा ज्योत
रायगड, नागपूर, बारामती- पुणे , लातूर, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, कोल्हापूर , अमरावती येथून दि.30 डिसेंबर 2022 रोजी पुणे येथे आणण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धेसाठी 19.08 कोटी रुपये व जिल्हा वार्षिक योजनेतून 11.51 कोटी रुपये असे एकूण 30.59 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
जिल्हानिहाय होणाऱ्या स्पर्धा –
- पुणे-ॲथलेटिक्स,फूटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, ज्युदो, लॉन टेनिस, मॉडर्न पँन्टाथलॉन, शुटींग, रग्बी, जलतरण-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलींग,स्क्वॅश, बॉक्सींग, हॉलीबॉल, रोलर स्केटींग,गोल्फ, सॉप्ट टेनिस,
- नागपूर- बॅडमिंटन,नेटबॉल, हॅण्डबॉल, सेपक टकरा
- जळगांव – खो-खो,सॉप्टबॉल, मल्लखांब, शुटींगबॉल
- नाशिक- रोईंग,योगासन
- मुंबई- याटींग, बास्केटबॉल
- बारामती- कबड्डी
- अमरावती- आर्चरी,
- औरंगाबाद – तलवारबाजी
- सांगली कनाईंग-कयाकिंग अशा ठिकाणी खेळाच्या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धा आयोजनासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
000
राजू धोत्रे/विसंअ/