सोलापूर, दि. 29 (जि. मा. का.) :- सर्व प्रकारचे मतभेद विसरून कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वांनी शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करावी ,असे प्रतिपादन केंद्रीय रासायनिक आणि खते, नवीन अक्षय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी आज येथे केले.
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थान, कृषि विभाग, आत्मा सोलापूर व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 52 व्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
होम मैदान येथे आयोजित या प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, इंडीचे आमदार यशवंतगौडा पाटील, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी बाळासाहेब शिंदे, निवृत्त उपसंचालक आत्माचे बरबडे, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा म्हणाले, मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो कारण आजच्या कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले. मी स्वत: शेतकरी नाही पण मला शेतीची खूप आवड आहे. माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 3.75 लाख शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांना राज्य व केंद्र शासनाच्या शेतीविषयक विविध योजनांचा लाभ मी स्वत: लक्ष देवून मिळवून दिला आहे. शेतकऱ्यांना बाबत कोणीही राजकारण करू नये. राजकारणासाठी बाकी खूप विषय आहेत. शेतकरी हा अन्नदाता आहे. आजच्या या काळात शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे खूप आवश्यक आहे. कोणतेही पीक घेताना त्या पिकावरील होणारा खर्च व त्यापासून मिळणारे उत्पादन या गोष्टींचा विचार पूर्वीच शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. केंद्राने व प्रत्येक राज्याने शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या योजना राबविल्या आहेत. या योजनांचा फायदा घेवून शेतकऱ्यांनी आपले जीवनमान उंचावले पाहिजे.
शेतकऱ्यांनी या कृषि प्रदर्शनामध्ये लावण्यात आलेल्या विविध स्टॉल मधून सर्व माहिती घेऊन व येथे काही मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. याचा फायदा आपल्या शेतीमध्ये केला पाहिजे. शेतकऱ्यांनी रोज किमान अर्धा तास तरी कृषि विषयक टिव्ही चॅनेलसुध्दा पाहिले पाहिजेत. हे कृषि प्रदर्शन खूप चांगले असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे, आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, सिध्दश्वर देवस्थान कमिटीने कृषि प्रदर्शनाचा खूप चांगला व शेतकऱ्यांच्या फायद्याचा उपक्रम राबविला आहे. या कृषि प्रदर्शनामध्ये जे काही मार्गदर्शन मिळेल त्यावर विचार करून आपल्याला आपल्या शेती मध्ये काय बदल करता येतील. आपले उत्पादन कसे वाढवता येईल याबद्दल मदत होईल. हे कृषि प्रदर्शन गेल्या अनेक वर्षापासून भरत आहे. पण अलीकडील काळात याचे रूप भव्यदिव्य असे होत आहे ही खूप चांगली बाब आहे.
श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी या प्रदर्शनाबद्दल उपस्थितांना माहिती देवून हे कृषि प्रदर्शन भरविण्याचे काय उद्दिष्ट आहे याबाबतची सविस्तर आशी माहिती उपस्थितांना दिली.
प्रदर्शनानिमित्त भव्य शामियाना उभारण्यात आला असून, २०० पेक्षा अधिक दालने उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये शेतीपूरक औजारे, प्रगत तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, दुर्मिळ देशी बियाणे, ट्रॅक्टर आदि शेती संबंधित दालनांचा समावेश आहे. २ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे.
या प्रदर्शनाचा शेतकरी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.