बाल वैज्ञानिकांच्या मॉडेल्सनी गाजवली भारतीय विज्ञान काँग्रेस

0
11

नागपूर, दि.  6 – भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बाल विज्ञान काँग्रेसमध्ये दैनंदिन वापरात येणाऱ्या पण अनोख्या प्रयोगांचे सादरीकरण बाल वैज्ञानिकांकडून करण्यात आले आहे.  प्रचंड आत्मविश्वास आणि अद्भूत असे आविष्कार या बाल विज्ञान काँग्रेसच्या प्रदर्शनात आपल्याला पहायला मिळत आहेत.

बेबी केअरिंग बेड, मद्यपान करून गाडी चालविल्यास वाजणारा अलार्म,  घरात  प्रवेश करताच सुरू होणारे घरातील दिवे, फ्लशचा पायाने  होणारा वापर, सांडपाण्याचा पुनर्वापर, गॅस गळतीची धोकासुचना देणारा प्रयोग, दृष्टीदोष सुधारण्यासाठी ॲप, पशुधन स्वच्छता, इमारत बांधकामावर ठिबक सिंचनप्रमाणे पाण्याचा नियंत्रित वापर, लाईफ सेफ्टी हेल्मेटचा वापर व गाडीचोरीपासून बचाव, गहू आणि तांदळाच्या वेष्टनापासून विविध वस्तुंची निर्मिती, माती परीक्षण अशा अनेक विज्ञान अविष्कारांनी  बाल वैज्ञानिक काँग्रेस लक्षवेधी ठरली आहे.

बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ‘निरी’चे माजी संचालक डॉ.सतिश वाटे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभामंडपात हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. 10 ते 17 वर्षे वयोगटातील बालवैज्ञानिकांचे विविध प्रयोग येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत.  अंदमान निकोबार पासून, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश अशा सर्वच  भागातून बालकांची या प्रदर्शनाला उपस्थिती  लावली  आहे.  अनोख्या पद्धतीने हे प्रयोग विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत.  विशेष म्हणजे या प्रदर्शनाची माहिती ही प्रत्येक स्टॅालमध्ये स्वतः विद्यार्थीच देत आहेत. अत्यंत  आत्मविश्वासाने त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वच वयोगटातील विज्ञानप्रेमींना आपापल्या प्रयोगांची माहिती देत आहेत. पालक आणि पाल्यांसाठी हे संपूर्ण विज्ञान प्रदर्शन लक्षवेधी ठरत आहे.

उद्या (दि. 7 जानेवारी) दुपारी भारतीय विज्ञान काँग्रेसचा समारोप होणार असून तत्पूर्वी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

00000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here