भारतातील विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच देशाचे सांस्कृतिक वैभव अधोरेखित करणारे ‘समृद्ध भारतीय वारसा स्थळे’ हे पुरातत्व उत्खनन आणि वास्तुकला वारसा दर्शविणारे प्रदर्शन येथे भेट देणाऱ्या जिज्ञासुंचे खास आकर्षण ठरत आहे. या प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
विद्यापीठ परिसरात प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व विभागात आणि केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या प्रागैतिहासिक शाखा आणि उत्खनन शाखेच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
वास्तुकला वारसा प्रदर्शनात नागपूरसह विदर्भातील महत्त्वाच्या वास्तूंची माहिती दर्शविण्यात आली आहे. यात काशीबाई का छत (वर्धा), नगर्धान किल्ला, जागृतेश्वर मंदिर (भंडारा),विटांचे मंदिर(वर्धा) यासह नागपुरातील केपी ग्राउंड, जुने उच्च न्यायालय, जुने सचिवालय, विधानभवन, आरबीआय, आयपीओ या इमारतीचे वास्तुकला वारसा प्रदर्शनाच्या दर्शनी भागात ठळकपणे मांडण्यात आला आहे.
गोंड वास्तुकलेचा सुबक वारसा
विदर्भात ठीक -ठिकाणी असलेले गोंड राजावटीतील वास्तुकलेचे सुंदर नमुने या प्रदर्शनात दर्शविण्यात आले आहेत. यात मुख्यत्वे गोंड राजाचे राज्य चिन्ह, गोंड राजाची समाधी(चंद्रपूर), जाटपुरा द्वार आणि विस्तीर्ण परिसरात स्थित असलेला बल्लारपूर किल्ला दर्शविण्यात आला आहे.
मराठी भाषेतील समृद्ध अशी झाडीबोली या ठिकाणी दर्शविण्यात आली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे झाडी बोली चा वापर. तसेच या भाषेतील ‘जागली’, ‘पोरका’, ‘वास्तुक विश्वंभर’, ‘लाडाची बाई’ पुस्तके ‘अजनाबाईची कविता’, ‘आडवा कविता’, ‘झाडीची कानात सांग’, ‘घामाचा दाम’, ‘झाडीची माती’ आदी काव्यसंग्रहांची नावे या ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करण्यात आली आहे. आड अर्थात माळी किंवा गच्ची उभार म्हणजेच जास्तीचा कौल म्हणजे कवेलू काऊन अर्थात का म्हणून असे झाले बोलतील शब्दही या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. झाडी बोलीतील समृद्ध नाट्यपरंपरा, कळसुत्री बाहुल्यांचे खेळ, कीर्तन, भारुड, वासुदेव, तमाशा, वग, दंडार, खडीगंमत, दशावतार या कलाप्रकारांचे या ठिकाणी सुबक प्रदर्शन लावण्यात आले आहे.
पुरातत्व उत्खनन
पुरातत्व उत्खननात आढळून आलेल्या वस्तुंचे भारतीय संस्कृतीतील योगदान दर्शविणारे अडम,मनसर आणि पवनी येथील वैभव दर्शविण्यात आले होते.
अडम (1988-1992)
नागपूर जिल्ह्यात (भंडारा नागपूर सीमेवर) असलेल्या अडम नावाचे ठिकाण डॉ. अमरेंद्र नाथ यांनी उत्खनन केले होते, तेथून प्रथमच ताम्रपाषाण- लोहयुग, निरंतर सातवाहनपूर्व आणि सातवाहन काळातील सांस्कृतिक ठेवी सापडल्या आहेत. तटबंदीच्या सातवाहन शहराच्या अवशेषांव्यतिरिक्त, येथून महत्त्वाच्या पुरातन वास्तू आणि मातीची नाणी सापडली आहेत, ज्यावर ब्राह्मी लिपीत ‘असीक जनपद’ कोरलेले आहेत.
पवनी (1968-70 आणि 1993-94)
भंडारा जिल्ह्यात स्थित पवनी येथे प्रथमच जे. पी. जोशी आणि एस. बी. देव यांनी उत्खनन केले. उत्खननात मौर्य काळातील प्राचीन स्तूपावर बांधलेल्या शूंग स्तूपाचे पुरावे मिळाले. विदर्भात असलेल्या कोणत्याही उत्खननातून या जागेवरून प्रथमच प्राचीन स्तूपाचा पुरावा मिळाला आहे. सन १९९३-९४ मध्ये डॉ.अमरेंद्र नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उत्खननात मौर्यपूर्व व मौर्य कालखंड, शूंग, सातवाहन व वाकाटक यांचे पुरावे मिळाले आहेत.
मनसर (१९९४-९५)
नागपूर जिल्ह्यातील मनसर येथे डॉ. अमरेंद्र नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन करण्यात आले, तेथून वाकाटक काळातील विटांनी बनवलेल्या मंदिराचे अवशेष मिळाले. संबंधित कलाकृती सापडल्या. पुरातन वास्तूंमध्ये उमा-महेश्वरा, लज्जागौरी, टेराकोटाच्या मूर्ती, लोखंडी चिलखत असलेल्या स्टुकोच्या मूर्ती, क्षत्रप आणि वाकाटक राज्यकर्त्यांची चांदी आणि तांब्याची नाणी आणि टेराकोटा साचे यांचा समावेश होतो. येथून मिळालेल्या मातीच्या भांड्यांच्या अभ्यासाच्या आधारे हे प्राचीन स्थळ इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील आहे. 6 ते 7 वी दरम्यानच्या कालावधीसाठी निर्धारित केले आहे.
-रितेश मो.भुयार
माहिती अधिकारी