नागपूर, दि. 6 – विज्ञानाचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा उद्या (दि.7) समारोप होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली सुरू असलेल्या या विज्ञान काँग्रेसचा समारोपीय कार्यक्रम दुपारी चार वाजता विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील मुख्य सभा मंडपात होणार आहे. समारोपीय कार्यक्रमाला नोबेल विजेत्या शास्त्रज्ञ प्रा. ॲडा योनाथ, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने या विज्ञान काँग्रेसचे यजमान पद भूषविले. विज्ञानप्रेमींचा उत्सफूर्त प्रतिसाद पहायला मिळाला. नोबेल पुरस्कारप्राप्त प्रा. ॲडा योनाथ यांची उपस्थिती व व्याख्यान यावेळी विशेष लक्षवेधी ठरली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने या विज्ञान काँग्रेसचे उदघाटन करण्यात आले.
२७ परिसंवादांचे आयोजन
विज्ञानप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या परिषदेत एकूण 27 परिसंवादांचे आयोजन करण्यात आले. यात विज्ञान क्षेत्रातील सर्वच विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.अनेक दिग्गजांनी या परिसंवादाला उपस्थिती दिली. भारताची 2030 मधील वाटचाल,अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान, कोविड आजारानंतर दिसून येणारे परिणाम, कर्करोग, पुरुष प्रजनन संदर्भातील संशोधन यासह विविध विषयांवर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. देश -विदेशातील अनेक संशोधक, वैज्ञानिक या परिषदेत सहभागी झाले होते. बाल विज्ञान प्रदर्शन
बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ‘निरी’चे माजी संचालक डॉ.सतीश वाटे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभामंडपात हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. 10 ते 17 वर्षे वयोगटातील बालवैज्ञानिकांचे विविध प्रयोग येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत. देशभरातील सर्वच भागातून आलेल्या बालकांची या प्रदर्शनाला उपस्थिती लावली .
महिला विज्ञान काँग्रेस
महिला विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले. विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत विकासाचे ध्येय प्राप्त करण्यात महिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे. महिलांनो आता स्वयंस्फूर्तीने विज्ञानक्षेत्रात भरारी घ्या आणि आकाश कवेत घ्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनीही आपले विचार यारदम्यान व्यक्त केले. असंख्य वाटचालींवर मात करीत केलेली वाटचाल त्यांनी यावेळी कथन केली.
प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन
भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. शहीद बिरसा मुंडा सभागृहात आदिवासी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांच्या हस्ते झाले. भारतीय विज्ञान काँग्रेसचे महासचिव डॉ.ए. रामकृष्ण, नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे,अधिष्ठाता डॉ. राजू हिवसे आणि आदिवासी विज्ञान काँग्रेसचे संयोजक डॉ.श्याम कोरेट्टी मंचावर उपस्थित होते. आदिवासींनी विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषध निर्मिती क्षेत्रात व्हावा, असा या आदिवासी विज्ञान काँग्रेसमधील सूर होता.
शेतकरी विज्ञान काँग्रेस
देश धान्य उत्पादनात खुप पुढे गेला आहे. यामागे शेतकऱ्यांची फार मोठी मेहनत आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार सुधारली नसल्याचे दिसून येते. शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्वाचा आहे. शेतकऱ्यांनी बाजारतंत्रही अवगत करणे आवश्यक असल्याचा या संमेलनातील सूर होता.
‘प्राईड इंडिया एक्सपो’ विशेष आकर्षण
प्राईड इंडिया एक्सपो हे या प्रदर्शनातील विशेष आकर्षण ठरले. या एक्सपो मध्ये अनेक विज्ञानविषयक स्टॅाल लावण्यात आले. यास विज्ञानप्रेमींची गर्दी पहायला मिळाली. शनिवार, दि. 7 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
सायंकाळी सहा ते आठ या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात गझल संध्या, स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित नाट्य, स्वरानंदन या कार्यक्रमांचा प्रामुख्याने समावेश आहे. पुरातत्व विभाग संग्रहालय, पॅलेस आन व्हिल्स ही गाडी, ॲालिम्पिकच्या धर्तीवर विज्ञान ज्योत, बाल वैज्ञनिकांच्या विविध प्रयोगांचे प्रदर्शन या संमेलनात पहावयास मिळाले.
00000