महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

0
10

पुणे, दि.८ : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, प्रदीप गंधे, तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अनिल झोडगे, सचिव संदीप ओंबासे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, महाराष्ट्र शासन नेहमीच खेळ आणि खेळाडूंना पाठिंबा देते. त्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करुन दिला जातो. जागतिक स्तरावर यश संपादन करणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत वर्ग-१ च्या पदावर नियुक्ती दिली जाते. सुरूवातीला हौस म्हणून खेळले जाणारे खेळ आता करियर म्हणून खेळले जात आहेत. खेळाडूंना आर्थिक बळ देण्याची आवश्यकता आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन शासनाने या क्रीडा स्पर्धा आयोजन करुन खेळाडूंना प्रोत्साहन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा आयुक्त डॉ. दिवसे म्हणाले, एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धा घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या स्पर्धांचा भविष्यात जिल्हा विकास क्रीडा आराखडा तयार करण्यास उपयोग होईल. या स्पर्धांमुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी मदत होईल असे सांगून या स्पर्धांसाठी वाढीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री श्री.पाटील यांना धन्यवाद दिले.

श्री. शिरगावकर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेविषयी माहिती दिली. या स्पर्धांमुळे खेळाविषयीची आवड घराघरात पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी तायक्वांदो स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील विजेत्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सुवर्ण, रजत व कांस्य पदक प्रदान करण्यात आले. तसेच दादोजी कोंडदेव पुरस्कार, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजते तसेच प्रशिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिम्नॅस्टिक स्पर्धेस भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. खेडाळूंनी यावेळी प्रात्यक्षिके सादर केली.
000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here