एक सजग अभ्यासू पत्रकार गमावला

0
3

मुंबई, दि. 9 : दूरदर्शनचे पहिले वृत्त निवेदक, पुणे तरूण भारतचे माजी संपादक, सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन चे संस्थापक, राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य संचालक डॉ.विश्वास मेहेंदळे यांच्या निधनाने एक जाणता पत्रकार आणि अभ्यासू लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

“डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी प. पू. डॉ. हेडगेवार ते मा. सुदर्शनजी अशा क्रमशः पाच सरसंघचालकांच्या चरित्र आणि कार्यावर ‘पाच सरसंघचालक’ हे पुस्तकही लिहिलं आहे. स्वतंत्र पत्रकाराच्या नजरेतून या पुस्तकात त्यांनी संघकार्याच्या दीर्घकाळाचा रोचक आढावा घेतला आहे. स्व. श्री. मेहेंदळे यांनी लिहिलेली विविध पुस्तके, त्यांनी घेतलेल्या मुलाखती, दूरदर्शनसाठी त्यांनी निर्मिलेले अनेक वृत्तपट यातून त्यांची अभ्यासू वृत्ती उठून दिसली. राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. एक सजग पत्रकार म्हणून राजकीय क्षेत्रासोबतच त्यांचा राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचा अभ्यास स्तिमित करणारा होता, त्याचबरोबर ते एक चांगले वक्ताही होते”, असे श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. डॉ. विश्वास मेहेंदळे यांना ईश्वर सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थनाही श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here