राज्य उत्पादन शुल्क विभागाने निर्धारित वेळेत उद्दिष्ट साध्य करावे – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि १० : राज्य उत्पादन शुल्क विभाग राज्याला महसूल मिळवून देणारा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाला चालू आर्थिक वर्षात दिलेले महसुली उत्पन्नाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा व पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या नियोजित बांधकामाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते.

या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी , उपसचिव युवराज अजेटराव यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, राज्य उत्पादन शुल्क विभाग राज्याला उत्पन्न मिळवून देण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. आगामी काळात विभागाच्या माध्यमातून महसूल वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे. विभागाची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने तसेच महसूल वाढवण्याकरीता काय उपाययोजना व उपक्रम राबविता येतील याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

निविदा प्रक्रिया तात्काळ करावी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारत बांधकामाबाबत निविदा प्रक्रिया तत्काळ करावी, अशा सूचना संबंधितांना मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. या बांधकाम प्रक्रियेत कुठल्याही त्रुटी राहू नये याची दक्षता घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

या इमारतीचे बांधकाम आराखडा तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयाच्या आवारात देण्यात येणाऱ्या सेवा सदनिकांचे बांधकाम आराखडाबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले.

*****

शैलजा पाटील/विसंअ/