पालघर जिल्ह्यात १० लाख वृक्ष लागवडीकरिता रोहयो आणि टाटा मोटर्स यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. 10 : राज्याचा रोजगार हमी योजना विभाग आणि टाटा मोटर्स यांच्यामध्ये पालघर जिल्ह्यात १० लाख वृक्ष लागवडीकरिता रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

मंत्री श्री. भुमरे यांच्या रत्नसिंधू या शासकीय निवासस्थानी हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी रोहयोचे अपर मुख्य सचिन नंदकुमार, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपसचिव संजना खोपडे, सहायक संचालक विजयकुमार कलवले, पालघर जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी समीर वाठारकर, टाटा मोटर्सचे प्रमुख विनोद कुलकर्णी प्रकल्प अधिकारी श्रीमती सोनपाल, बायफ प्रकल्पाचे सुधीर वागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रोहयो मंत्री श्री. भुमरे म्हणाले, विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीचा वापर शासनाच्या योजना सोबत अभिसरण करण्याबाबत शासनाने वेळोवेळी सूचित केले आहे. टाटा मोटर्सच्या सीएसआर निधी मधून संपूर्ण पालघर जिल्ह्यातील 5 हजार आदिवासी लाभार्थींना प्रत्येकी 200 याप्रमाणे 10 लाख वृक्ष लागवडीचे रोहयोसोबत अभिसरण करण्याकरिता सामंजस्य करार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

टाटा मोटर्स ही कंपनी आपल्या सीएसआर मधून समाज उपयोगी कामे करीत असते. अशा समाज उपयोगी कामांपैकी पर्यावरण हा देखील एक घटक आहे. ही बाब लक्षात घेता कंपनी काजू, चिकू, सीताफळ, कढीपत्ता, बांबू यासारख्या फळझाडांची, पिकांची कलमे, रोपे तसेच खते उपलब्ध करून देते. मागील दोन वर्षात कंपनीने पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, वाडा, मोखाडा या ठिकाणी सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीच्या माध्यमातून अशी रोपे दिलेली आहेत.

प्रामुख्याने अनुसूचित जमातीमधील लाभधारकांना याप्रमाणे कलमे उपलब्ध करून यावर्षीदेखील जवळपास दहा लाख कलमांचा पुरवठा टाटा मोटर्स करणार आहे. साधारणत: प्रति झाड 40 रुपये किंमत लक्षात घेतल्यास ही रक्कम जवळपास चार कोटी रुपये इतकी होती त्याचप्रमाणे खतांची देखील उपलब्धता करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी सांगितले की, वृक्ष लागवड ही प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर, बांधावर तसेच शेतकऱ्याच्या पडीक जमिनीवर होणार आहे. प्रती शेतकऱ्यांना साधारणत: 200 झाडे उपलब्ध करून देणार असून यामध्ये आंबा, काजू, सीताफळ, चिकू अशी मिश्र झाडे लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अकुशल कामासोबतच मजुरांना रोजगार मिळणे, त्याचप्रमाणे कुशल कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यासाठी देखील याचा उपयोग होईल. कंपनी याप्रमाणे रोप तसेच खते उपलब्ध करून देण्यासोबतच मृत झाडे पुन्हा उपलब्ध करून देणार आहे. कंपनीच्या या धोरणामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच लाभधारकांना याचा फायदा होणार आहे. उच्च प्रतीची कलमे शेतकऱ्यांना सहज मिळणार आहेत. आवश्यक ती खतेदेखील उपलब्ध होणार आहेत. त्यासोबतच शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे या प्रकल्पामुळे पर्यावरण संरक्षणासोबत मनरेगा कामांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ होईल. याप्रमाणे निर्माण झालेले फळ-पिके यासाठी कंपनी बाजारपेठ व पुढील कामासाठी देखील कार्य करणार असल्याचे मंत्री श्री. भुमरे यांनी यावेळी सांगितले.

०००००

राजू धोत्रे/विसंअ/